नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागात अनेक पोलीसांना वर्षातून एकदा पिसाळलेला कुत्रा चावत होता. त्यासाठी त्यांना विशेष रजा मिळत होती. सोबतच विशेष आहार भत्ता सुध्दा मिळत होता. शासनाकडून देण्यात आलेली सुविधा चांगलीच होती. कोणत्याही चांगल्या गोष्टीचे दुष्परीणाम पण असतात. असेच या श्वान दंशात होवू लागले. पोलीस दलातील अनेक पोलीसांना दरवर्षी श्वान दंश करतच होता. पण आता पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदियाचे कार्यालय अधिक्षक यांनी जारी केलेल्या एका पत्रानंतर यापुढे ज्या पोलीसांना कुत्रा चावेल त्यांना अवघड होणार आहे.
पोलीस ठाणे रामनगर शहर जि.गोंदिया येथील पोलीस अंमलदार सुनिल वंजारी बकल नंबर 1635 यांनी पिसाळलेला कुत्रा चावल्याने मिळणारी विशेष रजा मागितली. याबाबत त्यांनी 21 डिसेंबर 2022 रोजी पोलीस अधिक्षक गोंदिया कार्यालयाकडे अर्ज केला होता. पोलीस अधिक्षक कार्यालय गोंदिया येथील कार्यालय अधिक्षक संतोष गेडाम यांच्या स्वाक्षरीने 2 फेबु्रवारी 2023 रोजी सुनिल वंजारी यांना उत्तर देण्यात आले. त्यात पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर उपचाराकरीता विशेष रजा देय आहे परंतू आपल्याला चावलेला कुत्रा पिसाळलेला होता किंवा नाही याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याकरीता तुमचा अर्ज जोडून परत करण्यात येत आहे असे लिहिले आहे. दि.6 फेबु्रवारी 2023 रोजी पोलीस ठाणे रामनगर गोंदिया शहर येथे प्राप्त झाले. त्यावर पोलीस निरिक्षकांनी पोलीस अंमलदार वंजारी यांनी पुर्तता करावी असे पृष्ठांकन केले आहे.
हे पत्र आता विविध सामाजिक संकेतस्थळांवर व्हायरल झाले आहे. त्यावर लोकांनी प्रतिक्रिया लिहिल्याआहेत की, लक्षात घ्या कुत्रा चावला तर त्याला तेथे पकडा. त्याला जागेवरच विचार किंवा दवाखान्यात घेवून जा. जर सकाळी सकाळी कुत्रा चावला असेल तर त्याला बांधून ठेवा.10 वाजता दवाखान्यात घेवून जा. अगोदर कुत्राची टेस्ट करा आणि मग स्वत:चा इलाज करा. वा.. रे..सिस्टीम.
आज या पत्राची थटा उडवली जात असली तरी महाराष्ट्रातील पोलीस विभागाचा अभिलेख तपासला तर दरवर्षी किती पोलीसांना श्वान दंश झाला होता याचा अभिलेख उपलब्ध होईल. तसेच गोंदिया पोलीस अधिक्षक कार्यालयातील अधिक्षकांनी काढलेली त्रुटी चुकीची आहे असे का म्हणावे. याचे उत्तर मात्र पत्र व्हायरल करून त्यावर गमतीदार टिपण्या लिहिणाऱ्यांनी करावा.