नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील नुरी चौक भागात काल सायंकाळी 5:30 वाजता गोळीबार झाला. त्यात एक युवक जखमी झाला आहे. दोघांनी मिळून हा गोळीबार केल्याची घटना घडली आहे.अवैध्य पिस्तूल कोठून येत आहेत हा सर्वात मोठा प्रश्न या गोळीबारामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे.
शेख गुड्डू शेख दस्तगीर 50 रा.नवी आबादी नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काल सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास वसंता नगर नांदेड येथे संतोष लक्ष्मण कैनवाड आणि हरजीतसिंघ उर्फ जितू लच्छिंदरसिंघ बनू या दोघांनी त्यांचा मुलगा शेख इरफान यांच्या पोटावर गोळी मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
विमानतळ पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 34, आणि भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 नुसार गुन्हा क्रमांक 48/2023 दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रवी बुरकुले यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला आहे.
शहरात अवैद्य बंदुकी कुठून येत आहेत हा सर्वात मोठा प्रश्न या गोळीबारामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. गोळीबार झाला तर त्या भागातच नव्हे तर संपूर्ण शहरात याबाबतची चर्चा सुरू होते, दहशत पसरते आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपल्या सुरक्षिततेबाबत चिंतित होतो. पोलीस विभाग गोळीबार करणाऱ्यांना लवकरात जेरबंद करेल असा विश्वास पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी वास्तव न्यूज लाईव्ह सोबत बोलताना व्यक्त केला.