नांदेड(प्रतिनिधी)-मटका जुगार बंदच नाही याचा प्रत्यक्ष पुरावा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी छापा टाकून पाच जणांविरुध्द महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर सिध्दच झाले. आता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याला याचा जाब विचारला जाणार काय? या प्रश्नाचे उत्तर फक्त पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळेच देऊ शकतात.
स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय नरहरी काळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.28 जुन 2021 रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास त्यांनी आपल्या सहकारी पोलीस अंमलदारांसोबत खुदबईनगर चौक येथे शेख युसूफ मिस्त्री यांच्या एका दुकानात छापा टाकला. त्या ठिकाणी शमीउल्ला खान अब्दुल्ला खान (40) रा.महेबुबीया कॉलनी नांदेड, महंमद ईरशाद महंमद अब्बु बकर (43) रा.उमर कॉलनी, गुलाम अहेमद गुलाम अली (40), शेख बाबू शेख छोटे मियॉं (42) रा.खुदबईनगर चौक आणि शेख मुजाहिद शेख अहेमद रा.चौफाळा (मटका किंग) अशा पाच जणांच्या नावावर तक्रार दिली. पोलीसांनी येथून 3 हजार 190 रुपये रोख रक्कम हे शमीउल्ला खानकडून जप्त केले. 2260 रुपये रोख रक्कम महंमद इरशादकडून जप्त केले. गुलाम अहेमद आणि शेख बाबूकडून 1900 रुपये आणि मटका जुगार चालविण्याचे साहित्य जप्त केले. या सर्व चौघांचा म्होरक्या शेख मुजाहिद शेख अहेमद आहे. अशा पाच जणांविरुध्द दत्तात्रय काळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 449/2021 महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 4 आणि 5 नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार जे.एस.शेख हे करीत आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यावर कार्यवाही केल्यानंतर त्या पोलीस ठाण्याच्या प्रमुखाविरुध्द, बिट अंमलदाराविरुध्द कार्यवाही होत असते असे ऐकीवात आहे. आता नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यावर आणि खुदबईनगर भागातील बिट अंमलदाराविरुध्द कांही कार्यवाही होणार काय ? या प्रश्नाचे उत्तर फक्त पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळेच देऊ शकतात.
या जुगाराच्या छाप्यानंतर एक खळबळजनक माहिती प्राप्त झाली. त्यानुसार मटका जुगार चालकांचा मुळ मालक (मटका किंग) हा या गुन्ह्यातील एकूण जप्त रक्कमेच्या प्रमाणे अर्थात गुन्हा क्रमांक 449 मध्ये एकूण जप्त रक्कम 7350 एवढी रक्कम मटका बुक्की चालकाला देत असतात. या पेक्षा जास्त पैसे तेथे असतील तर मटका बुक्की चालकाला ते पैसे आपल्या खिशातून, आपल्या उत्पन्नातून भरपाई करावी लागते. कारण मटका चालविण्याची गुप्त परवानगी मटका किंगची असते. आणि तो पोलीस प्राथमिकीमध्ये लिहिलेली रक्कमच बुक्की चालकाला देत असतो अशी माहिती सांगण्यात आली. सोबतच या बाबत कांही माहिती प्राप्त झाली नाही की, त्या दिवशी पोलीसांनी मटका जुगाराचे लिहिल्यांचे आकड्यांचे कागद जप्त करतात मग त्यानुसार एखाद्याचा मटका आकडा लागला तर तो कागद मटका बुक्की चालक कोठून शोधणार त्यासाठी सुध्दा वेगवेेगळे गुप्त नियम आहेत म्हणे.
मटका जुगार सुरूच आहे; स्थागुशाने छापा टाकून सिद्द केले