3नांदेड(प्रतिनिधी)-विद्यापिठामध्ये विद्यावाचस्पती (पीएचडी) प्राप्त करायची असेल तर यासाठी महिलांना आपला विनयभंग करून घ्यावा लागेल आणि पोलीस ठाण्यातून “तोडगा’ घेवून परत आपल्या घरी बसावे लागले ही तयारी असेल तरच महिलांनी पीएचडी पदवी प्राप्त करण्यासाठी आपले अर्ज करावेत असे प्रकार घडत आहेत.
अत्यंत खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.26 जून रोजी सायंकाळी विद्यापीठ परिसरात एका पीएचडी विद्यार्थी असलेल्या महिलेचा तिच्या मार्गदर्शकाने (गाईडने) विनयभंग केला. घडलेल्या प्रकाराने व्यथीत झालेली ती महिला घरी गेली. घरी आपल्या नातलगांना घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर 27 जून रोजी दुपारी ही महिला आपल्या उच्च शिक्षीत आणि शासकीय नोकरीत असलेल्या भावासोबत पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे पोहचली. रात्री 09.05 वाजेपर्यंत त्या महिलेची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही आणि रात्री 10 वाजता त्या महिलेची “तोडगा’ या शब्दावर बोळवण करून तिला घरी पाठविणयात आले. त्यानंतर 28 जून हा दिवस संपला. आज 29 जूनची दुपार आहे. तरीपण या महिलेचा गुन्हा पोलीसांनी दाखल केला नव्हता. या प्रकरणाचा मागोवा घेतला असता विद्यापीठातील अतिउच्च, मान ठेवणाऱ्या, वजन असलेल्या लोकांनी प्रयत्न करून त्या महिलेचा गाईड आपल्या आणि महिलेच्या कुटूंबासमोर जाहिर माफी मागण्याचा “तोडगा’ काढण्याचे ठरले. पण 29 जूनच्या दुपारी 2 वाजेपर्यंत तरी हा “तोडगा’ प्रत्यक्षात आला नव्हता.
एखादी महिला पोलीस ठाण्यात येते आपली तक्रार देण्याची तयारी ठेवते मग त्यावर “तोडगा’ का काढायचा या प्रश्नाचे उत्तर मात्र कुठेच भेटले नाही. कारण फौजदारी प्रक्रियासंहितेमध्ये “तोडगा’ हा शब्द खुप शोधला पण तो कोठेच सापडला नाही. फौजदारी प्रक्रिया संहिता आणि “तोडगा’ यांचा कोठे परस्पर संबंध असेल तर त्याचा शोध घेण्याची गरज आहे. यावरून एवढे एक नक्की लक्षात आले की, कोणाला पीएचडी हवी असेल, विशेष करून महिलांना पीएचडी पदवी प्राप्त करायची असेल आणि त्यांचा गाईड पुरूष असेल तर त्यांनी विनयभंग करून घेण्याची तयारी ठेवावीच लागेल आणि सोबतच “तोडगा’ काढून घेण्याची मानसिक तयारी राखवूनच ठेवावी लागेल. कारण पोलीस ठाण्यात एफआयआर ऐवजी “तोडगा’ काढला जातो म्हणून महिलांनी अशी तयारी ठेवूनच पीएचडीसाठी प्रवेश घ्यावा असे लिहिले तर चुक ठरणार नाही.
महिलानों पीएचडी हवी काय?; विनयभंगाची तयार ठेवा !