
नांदेड(प्रतिनिधी)-निकली है सवारी जय बोलो महाकाल की अशा घोषणांनी दुमदुमून गेले शहर. आज काही महादेव भक्तांनी देवाधी देव महादेवांची भव्य मिरवणूक काढली. जुना मोंढ्यातून सुरू झालेली ही मिरवणूक सायंकाळी 6 वाजेच्यासुमारास समर्थ मंदिर सोमेश कॉलनी येथे समाप्त होणार आहे.
आज सकाळी 11 वाजता जुना मोंढा भागातील खंडेलवाल स्विटस या दुकानापासून महादेवांची एक मोठी प्रतिमा, तसेच पालखी, नंदीवर बसलेले महादेव आणि त्यांचे काही गण अशा स्वरुपात ही मिरवणूक सुरू झाली. मिरवणूकीत ढोल, ताशे, भजन गायक आदी सहभागी झाले. निकली है सवारी जय बोलो महाकाल की या घोषणांनी आसमंत दुमदुमले होते. अनेक भक्ती गिते गायली गेली. मिरवणूक पाहण्यासाठी लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती. काही लोकांनी पालखीतील महादेवांना प्रसाद अर्पण करून त्याचे वाटप केले.

मिरवणूकीत शांतता व सुव्यवस्था प्रस्तापित राहावी म्हणून पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे, रमेश खाडे यांच्यासह वजिराबाद पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस अंमलदार या मिरवणूकीसोबत वावरत होते. वृत्तलिहिपर्यंत ही मिरवणूक वजिराबाद भागात होती. जशी-जशी मिरवणूक पुढे येत गेली हळूहळू वाढत गेली आणि मिरवणूकीचा महासागर झाला.

