नांदेड(प्रतिनिधी)-लोहमार्ग घटकात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेतांना लोहमार्ग महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक डॉ.प्रज्ञा सरवदे यांनी भारतीय दंड संहितेतील कलम 376 कलमाचा अर्थात बलात्काराचा गुन्हा दाखल करतांना भारतीय दंड संहितेतील कलम 375 कलमामधील तरतुदींची पुर्णपणे खात्री करूनच हा गुन्हा दाखल करावा असे परिपत्रक जारी केले आहे.
दि.3 फेबु्रवारी 2023 रोजी लोहमार्गाच्या पोलीस महासंचालक डॉ.प्रज्ञा सरवदे यांनी जारी केलेले परिपत्रक अत्यंत स्पष्ट आहे. परंतू गुन्हा दाखल करतांना अशी स्पष्टता दाखल करणाऱ्याला घेता येवू शकते काय? असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे. या परिपत्रकात लोहमार्ग या पोलीस घटकात गंभीर गुन्ह्यांचा आढावा घेत असतांना रेल्वे पोलीस ठाणे कुर्ला येथील गुन्हा क्रमांक 1115/2022 मध्ये अनेक बाबी प्रज्ञा सरवदे यांनी उल्लेखीत केल्या आहेत. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम 376 जोडण्यात आले आहे. पण या प्रकरणातील फिर्यादी महिलेची ओळख जीवनसाथी यासंकेतस्थळावर झालेली आहे. त्यातून प्रेम संबंध निर्माण झाले. लग्नाची बोलणी करण्यासाठी याप्रकरणातील आरोपीने पिडीत महिलेला मुंबईत बोलावले आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. फिर्यादी महिलेने लग्नासाठी वारंवार विचारणा केली असता तो टाळाटाळ करत होता आणि लग्नाला नकार देत होता. यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ.प्रज्ञा सरवदे यांनी आपल्या परिपत्रकात भारतीय दंड संहितेच्या कलम 375 मध्ये बलात्काराची व्याख्या लिहिलेली आहे असे नमुद करून महिलेच्या इच्छेविरुध्द, तिच्या संमतीवाचून, तिला किंवा तिला आस्था असणाऱ्या व्यक्तीला मृत्यूचे किंवा दुखापतीचे भय दाखवून तिची मिळविण्यात आलेली संमती, आपण तिचे पती नाही आणि ती ज्याच्याशी कायदेशीरपध्दतीने विवाहबध्द झालेली आहे तो आपणच आहोत असे समजून दिलेली संमती, संमती देते वेळी मनोविकलता किंवा त्या पुरुषाने व्यक्तीश: किंवा दुसऱ्या व्यक्तीमार्फत गुंगीकारक किंवा अपथ्यकारक पदार्थ सेवन करण्यास दिल्यामुळे आपण त्याला संमती देत आहोत त्याचे परिणाम समजून घेणे तिला अशक्य झाले असेल आणि ती 18 वर्षापेक्षा लहान वयाची असेल याबाबतीत तिच्या संमतीने किंवा संमतीवाचून असा प्रकार घडला असेल तरच भारतीय दंड संहितेतील कलम 376 चा गुन्हा दाखल होता.
गुन्हा क्रमांक 1115 मध्ये जबरदस्ती झालेली नाही, शारिरीक संबंध हे पिडीत महिलेच्या संमतीवरुन आलेले आहेत. त्या दोघांमधील प्रेम संबंध असतांना तिने त्याच्यासोबत स्वखुशीने ठेवलेले शारीरिक संबंध व कालांतराने आरोपीने पिडीत महिलेस लग्नाला नकार दिला म्हणून 376 कलमान्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणे कायदेशीर वाटत नाही. म्हणून असे काही प्रकरण आले असतांना कलम 375 मधील व्याख्या वाचून त्यांची खात्री करावी आणि त्यानंतर गुन्हा दाखल करावा किंवा भारतीय दंड विधानाच्या ज्या कलमात तक्रारीचे स्वरुप येत असेल त्याप्रमाणे गुन्हा दाखल करावा अन्यथा प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करावी असे परिपत्रकात लिहिले आहे.या परिपत्रकाच्या प्रति पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई, पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे, लोहमार्ग नागपूर, लोहमार्ग औरंगाबाद यांना पाठविण्यात आल्या आहेत.
बलात्काराचा गुन्हा दाखल करतांना सखोल चौकशी करा-लोहमार्ग पोलीस संचालक डॉ.प्रज्ञा सरवदे