पोलीस निरीक्षकांच्या हातातील कार्बाईनमधून निघालेली गोळी पोलीस उपनिरीक्षकाला लागली

कळमनुरी,(प्रतिनिधी)- गावातील मकोका कायद्यातील एका फरार गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या हिंगोली पोलीस पथकासोबत गुन्हेगाराने झटापट केल्या नंतर पोलीस निरीक्षकांच्या हातात असलेल्या कार्बाईन या बंदुकीतून गोळी झाडली गेली आणि ती गोळी पोलीस उप निरीक्षकांच्या डाव्या बरगडीत लागून बाहेर निघून गेली.परंतु हिंगोली पोलिसांनी मकोका आरोपीला पकडलेच.जखमी पोलीस उप निरीक्षकांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

हिंगोली पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी कळमनुरीचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे,पोलीस निरीक्षक शेख माजीद आणि अनेक पोलीस अंमलदार इंदिरा नगर भागात गुन्हा क्रमांक ३२४/२०२१ या मकोका प्रकरणातील फरार आरोपी बबलूसिंग उर्फ हनुमानसिंग हत्यारसिंग टाक (२५) यास पकडण्यासाठी गेले.गुन्हेगाराला पकडतांना त्याने केलेल्या झटापटीत पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या हातात असलेल्या कार्बाईन या बंदुकीला धक्का लागून त्यातून एक गोळी फायर झाली.ती गोळी बाजूला उभ्या असलेल्या पोलीस उप निरीक्षक शेख माजिद शेख इब्राहिम यांच्या डाव्या बरगडीत घुसली आणि ते जखमी झाले.त्यांच्यावर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शेख माजिद नांदेडचे भूमिपुत्र आहेत.सन २०२१ मध्ये ते पोलीस उप निरीक्षक बनले आणि पहिलीच नियुक्ती कळमनुरी पोलीस ठाण्यात मिळाली आहे.वैद्यकीय सूत्रांनी सांगितल्या प्रमाणे शेख माजिद यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

घडलेल्या प्रकरबाबत कळमनुरी पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार अरविंद हेमराज राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून बबलूसिंग उर्फ हनुमानसिंग हत्यारसिंग टाक विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३,२२४,३३२ आणि हत्यार कायदा कलम ४/२५ नुसार गुन्हा क्रमांक ११९/२०२३ दाखल करण्यात आला आहे.त्यांच्या घरातून पोलिसांनी एक तलवार जप्त केली आहे.बबलूसिंग उर्फ हनुमानसिंग हत्यारसिंग टाक या अटक करण्यात आली आहे. जखमी पोलीस उप निरीक्षक शेख माजिद यांची भेट घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक जय जाधव यांनी विचारपूस केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *