नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांची सहल इस्रो अंतरीक्ष केंद्र श्रीहरीकोटा येथे नेण्यात येणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड परीक्षा आज जिल्ह्यातील 176 केंद्रांवर घेण्यात आली. 12 हजार 500 विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम असून यासाठी जिल्हास्तरावर समिती नियुक्त करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या मार्गदर्शनात परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
उपग्रह प्रक्षेपणाचा साक्षात अनुभव घेता यावा आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधन दृष्टी वाढीस लागावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 48 विद्यार्थी निवडण्यासाठी दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी 50 प्रश्नांची आणि 100 गुणांची निवड चाचणी परिक्षा घेण्यात आली. यासाठी केंद्रस्तरावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. 176 केंद्रांसाठी 176 केंद्र समन्वयक आणि 412 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.
केंद्रस्तरावरील सहभागी विद्यार्थ्यांमधून तालुकास्तरावर होणाऱ्या परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रातून 5 विद्यार्थिनी आणि 5 विद्यार्थी अशा 10 विद्यार्थ्यांची नावे तालुकास्तरावरील परीक्षेसाठी पाठविण्यात येणार आहेत. तालुकास्तरावरील परीक्षा 3 मार्च रोजी आणि जिल्हास्तरावर 10 मार्च रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेतून जिल्हास्तरावर 48 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून 50 टक्के विद्यार्थिनिंचा सहभाग असणार आहे. शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी आज परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली.