अर्धापूर,(प्रतिनिधी)-नांदेड अर्धापूर रस्त्यावर एका कारने एका मालवाहू गाडीसह दुसऱ्या कारला धडक दिल्याच्या परिणामात दोन जण जागीच मरण पावले आहेत. इतर अनेक जण जखमी झाले आहेत. महामार्ग पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमींना उपचारासाठी रात्रीच रुग्णालयात पाठवले.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल रात्री दहा वाजेच्या सुमारास एम एच 37 जी 9889 ही गाडी अत्यंत भरधाववेगात नांदेड कडे येत असताना तिने पाईप कारखान्यासमोर मालवाहू गाडी क्रमांक एम एच 13 सी यु 4244 ला जोरदार धडक दिली. त्यानंतर झालेल्या धडकेनंतर प्रवासी गाडी क्रमांक एम एच 23 एडी 3567 ला पुन्हा धडक दिली यामध्ये मालवाहू गाडीचे चालक रामा विठ्ठल डोंगरे (50) राहणार सोलापूर जिल्हा आणि अमित विठ्ठल घुगे (29) राहणार गीता नगर नांदेड हे दोघे जागीच ठार झाले.
या तिहेरी अपघातात स्वप्निल पाटील,अभिजीत शिरफुले, साईनाथ मुळे, नजमा बेगम, सय्यद अहमद, नाविद बेगम,जेनब सय्यद, सय्यद इयान असे लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.