स्थानिक गुन्हा शाखेने मटका किंगच्या नावासह गुन्हा दाखल केला
नांदेड(प्रतिनिधी)-सलग दुसऱ्या दिवशी स्थानिक गुन्हा शाखेने वजिराबाद हद्दीत मटका जुगारावर छापा मारून मटका किंगसह तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. यावरुन मटका हा जुगार कायम सुरूच असतो असे दिसते. वजिराबाद पोलीसांनी सुध्दा एका मटका जुगार अड्ड्यावर छापा मारला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार संग्राम व्यंकटी केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 जून रोजी सायंकाळी 5.45 वाजता नांदेड शहरातील बसस्थानकाच्या पुलाजवळून मिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी राजकुमार विश्र्वांभर बहादुरे रा.खडकपुरा आणि पांडूरंग काशिनाथ पंडीत रा.शिवशक्तीनगर नांदेड यांना पकडले. ही मटक्याची बुक्की कमल यादव यांची असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर संग्राम केंद्रे यांनी आपल्या तक्रारीमध्ये कमल यादवचे पण नाव लिहिले आहे. मिलरोडवरील पाटील हॉस्पीटलसमोर मोकळ्या जागेत टाईम बाजार क्लोज नावाचा मटका जुगार या लोकांनी चालवला होता. त्यांच्याकडून 2430 रोख रक्कम जप्त करण्यात आली असून वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमंाक 207/2021 महाराष्ट्र जुगार कायद्याच्या कलम 12(अ) नुसार दाखल केला आहे.
वजिराबादचे पोलीस अंमलदार विजयकुमार नंदे यांच्या तक्रारीवरुन भगतसिंघ रोडवर जुगार चालविणाऱ्या दिनेश सुभाष शाहुविरुध्द मटका जुगार चालविण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 1230 रुपये जप्त करण्यात आले आहेत. यावरुन मटका जुगार बंद होतच नाही हे पुन्हा एकदा या दोन गुन्ह्यांच्या नोंदणीनंतर समोर आले आहे. मटका जुगार चालविण्यातील मटका किंगचे नाव सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेच्या तक्रारीत नोंदविण्यात आले आहे.
वजिराबाद भागात सुध्दा मटका सुरूच