नांदेड-(प्रतिनिधी)- नांदेड येथून कुंभार समाजाचा इतिहास, संस्कृती, योगदान आणि कुंभार समाजाच्या विविध प्रश्नांचा वेध घेणारे कुंभार समाज :इतिहास आणि परंपरा हे पुस्तक पत्रकार उत्तम गोरडवार मांजरमकर व उद्योजक अॅड संजय रुईकर यांच्या संयुक्त संपदनातून प्रकाशनासाठी सिध्द झाले असून आज ( रविवार ,दि ५ मार्च )अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हाॅटेल सिटी प्राईड येथे सकाळी ११-००वाजता आयोजित करण्यात आलेल्या या प्रकाशन सोहळ्यास अध्यक्ष म्हणून माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर तर नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर, नांदेड दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे, कुंभार समाज सामाजिक संस्था, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सतीशदादा दरेकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तथा गोरोबा काका महाराष्ट्र माती महाराष्ट्रात बोर्डाचे संस्थापक कार्याध्यक्ष संजय गाते, महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत तथा शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार,सुप्रसिद्ध कवयित्री तथा साहित्यिक डाॅ वृषालीताई किन्हाळकर, नागपूरच्या शिक्षणाधिकारी रोहिणीताई कुंभार आदिं मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
प्रस्तुत पुस्तक एकूण सहा विभागात सामावले असून संत गोरोबा काकांचे समाज प्रबोधन, राजा शककर्ता सम्राट शालीवाहन यांच्या पराक्रमाची गाथा, जुलमी सत्तेला उलथून टाकण्यासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी एका विशिष्ट जातीची वा धर्माची माणसे शोधण्यापेक्षा इमानदार व पराक्रमी माणसांचा शोध घेतला. त्यात कुंभार समाजातील काळोजी कुंभार यांचे स्वराज्य कार्यातील योगदान याविषयी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.
कुंभार समाजातील विद्यार्थ्यांना आपले व्यक्तीमत्व आणि करिअर यांची योग्य जडणघडण करण्यासाठी या पुस्तकाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे .
कुंभार समाजाचा इतिहास, कला,आरोग्यदायी जीवनासाठी मातीच्या भांड्याची आवश्यकता, माती कला बोर्ड आदिं विषयांवरही या पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे.
कुंभार समाजात समर्पित भावनेतून विविध क्षेत्रात कार्य करणा-या मान्यवरांच्या कार्याचा आढावा ” व्यक्तीविशेष “या विभागात घेतला आहे. कुंभार समाजातील महाराष्ट्रातील ज्या प्रज्ञावंत, ज्ञानवंत व कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्वाचे नुकतेच निधन झालेले आहे,समाजातील अशा मान्यवरांना ‘आदरांजली ‘ या विभागातून त्यांच्या जीवन कार्याला वंदन करण्यात आले आहे. शेवटी, या पुस्तकातून शेवटच्या ‘ जनगणना ‘या विभागातून नांदेड महानगरात सध्या वास्तव्यात असलेल्या कुंभार समाजातील कुटुंबांची माहिती देण्यात आली आहे. एकंदरीत हे पुस्तक म्हणजे कुंभार समाजाचे एक ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक दस्ताऐवज व संदर्भ ग्रंथ झालेला आहेच,शिवाय कुंभार समाजातील युवा पिढीला सर्वांगिण विकासाची प्रेरणा देईल. अर्थातच्, हा ग्रंथ कुंभार समाजासाठी दीपस्तंभाचे कार्य करणारा आहे. अतिशय कल्पक आणि आदर्शवत् असा हा उपक्रम असून या पुस्तकाचे संपादक उत्तम गोरडवार मांजरमकर आणि अॅड. संजय रुईकर यांचे कौतुक करण्यासारखे आहे. या प्रकाशन समारंभासाठी कुंभार समाजातील बंधू-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संपादकांच्यावतीने करण्यात आले आहे.