नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलेने पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे येवून आपल्या सासरच्या मंडळीच्या जाचापासून वाचवावे असा अर्ज दिला आणि तिला झालेल्या उलट्यांमुळे शिवाजीनगर पोलीस परेशान झाले. पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी त्वरीत प्रभावाने घेतलेल्या मेहनतीने ती महिला ही वाचली पण पोलीसांनी तिच्याविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न असा गुन्हाही दाखल केला. सोबतच तिच्या सासरच्या मंडळीविरुध्द सुध्दा गुन्हा दाखल केला.
आज दि.4 मार्च रोजी सकाळी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे पोलीस अंमलदार ब्रिविश लामदाडे यांची पोलीस ठाणे अंमलदार या पदावर ड्युटी होती. सकाळी 11.30 वाजता त्यांच्याकडे एक महिला आली आणि तिने एक अर्ज पोलीस अंमलदारांकडे दिला. पोलीस अंमलदार तो अर्ज वाचत असतांना त्या महिलेने आपल्या पर्समधील पुडीतून काही तरी खाल्याचे पोलीस अंमलदाराने पाहिले. ती महिला आजारी असल्याचे पोलीस अंमलदारांना वाटले म्हणून त्यांनी तिला पाणी प्यायला दिले. पण ती महिला सांगत होते की, मी सन 2013 पासून लग्न झाल्यानंतर आजपर्यंत सासरची मंडळी माझा छळ करत आहे आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून मी उंदिर मारण्याचे औषध आताच खाले आहे. शिवाजीनगरच्या सर्व पोलीस अंमलदारांनी घाई करत त्या महिलेला त्वरीत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. घडलेल्या घटनेची माहिती आपले पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांना दिली. मोहन भोसले हे त्यावेळी आयटीआय चौकात एका आंदोलनात बंदोबस्त करत होते. पण घडलेला प्रकार आणि त्यातील गांभीर्य लक्षात घेवून मोहन भोसले त्वरीत शासकीय दवाखान्यात आले. दवाखान्यात सोनाली बाबाराव डाखोरे यांच्यावर उपचार सुरू होते.
पोलीस अंमलदार लामदाडे वाचल असलेली तक्रार मोहन भोसले यांनी आपल्या ताब्यात घेतली. त्यात महिलेच्या सासरची मंडळी सन 2013 पासून अर्थात त्यांचे लग्न झाल्यापासून त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देत होती असा तो अर्ज होता. या संदर्भाची सुध्दा मोहन भोसले यांनी त्वरीत दखल घेतली. सोनाली बाबाराव डाखोरे यांच्या तक्रारीवरुन त्यांच्या सासरच्या मंडळीविरुध्द शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोबतच पोलीस अंमलदार ब्रविश लामदाडे यांच्या तक्रारीवरुन सोनाली डाखोरेविरुध्द सुध्दा आत्महत्येचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडे तक्रार देतांना मरण्याची गरज काय?
पोलीस ठाण्यात तक्रार देतांना तेथे मृत्यूचा प्रयत्न करण्याची गरज काय? पोलीस विभाग भारताच्या जनतेच्या सेवेसाठीच तैनात करण्यात आलेला आहे. आमची तक्रार ते ऐकणार नाहीत तर मग कोण ऐकणार? 24 तास उघडे राहणारा कोणता दरवाजा असेल तर ते फक्त पोलीस ठाणे आहे. अशा परिस्थितीत आम्ही अर्ज दिल्यानंतर आम्हाला गैरकायदेशीर कार्य करण्याची काही गरज नाही. म्हणूनच वास्तव न्युज लाईव्ह या शब्दांना महत्व देत हे प्रसिध्द करत आहे.