नांदेड(प्रतिनिधी)-जीअर स्वामी मठात जानेवारी महिन्यापासून सुरू झालेला सत्तासंघर्ष उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील न्यायमुर्ती संदीपकुमार सी. मोरे यांनी स्थगिती दिल्यामुळे आता नवीन पध्दतीने हा सत्तासंघर्ष सुरू होणार आहे.
आदरणीय महंत स्वामी श्री.लक्ष्मणाचार्यजी यांनी नांदेडमध्ये जीअर स्वामी मठाची स्थापना बहुतेक 100 वर्षापुर्वी केली. नांदेडसह जालना आणि इतर ठिकाणी सुध्दा जीअर स्वामी मठाच्या शाखा आहेत. नांदेडमध्ये जीअर स्वामी मठाची जवळपास 50 एकर शेत जमीन आहे. त्याची आजची किंमत कोट्यावधी रुपयांची असेल. तसेच जीअर स्वामी मठाच्यावतीने संचलित श्री.बालाजी भगवान मंदिर गाडीपुरा येथे सुध्दा आजच्या परिस्थितीच्या आजच्या बाजार भावाप्रमाणे कोट्यावधी रुपयांची संपत्ती आहे. महंत श्री.लक्ष्मणाचार्यजी महाराज यांनी या जीअर स्वामी मठाची स्थापना केली तेंव्हा ते धर्मदाय कार्यालयाकडून नोंदणीकृत करून घेतले. यामध्ये एकटे महंतच सर्व काही मालक, प्रशासक आणि इतर होते. त्यांना गाडीपुरा भागातील काही मोठ्या व्यक्तींनी मदत केली आणि जीअर स्वामी संस्थानचा कारभार हळुहळु वाढत गेला. त्यावेळी संपत्ती हा भाग महत्वपूर्ण नव्हता तर माणुसकी आणि सेवा या दोन शब्दांना जास्त महत्व होते.
आपल्या वयाप्रमाणे महंत श्री.लक्ष्मणाचार्यजी महाराज यांनी आपल्या पदाचा वारसदार ठरविण्यासाठी 1980 च्या दशकात व्यंकटेश दलसिंगार दुबे आणि त्यांचा भाऊ प्रदीप दुबे या दोघांना नांदेडला आणले. त्यावेळी घडलेल्या अनेक कारणांच्या परिणामात या दोन्ही दुबे बंधुंची रवानगी बाहेर करण्यात आली.त्यातील व्यंकटेश दुबे यांची नियुक्ती बारड येथील मंदिरात करण्यात आली. त्यानंतर आपला उत्तराधिकारी म्हणून महंत स्वामी श्री.लक्ष्मणाचार्यजी यांनी केशवाचार्यजी यांची नियुक्ती जीअर स्वामी मठाच्या महंतपदावर केली आणि लक्ष्मणाचार्यजी यांच्या मृत्यूनंतर केशवाचार्यजी हेच या जीअर स्वामी मठाचे महंत झाले. त्या काळात सच्चिदानंद लल्लन मिश्रा हे बालाजी मंदिरात पुजारी या पदावर कार्यरत होते. त्यांची नियुक्ती पुढे जालना येथील नरनारायण मंदिरात झाली.
महंत केशवाचार्यजी हे आपल्या दैनंदिन आध्यात्मिक जबाबदारीला पार पाडून पावडेवाडी शिवारातील आपल्या शेतीकडे स्वत: लक्ष देत होते. असेच एकदा दि.6 नोव्हेंबर 1999 रोजी ते आपल्या शेतातून परत येत असतांना त्यांच्यावर काही जणांनी हल्ला केला आणि गावठी पिस्तुलमधून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.त्यावेळी नांदेडमध्ये तणाव तयार झाला होता. गाडीपुरा भागातील वरिष्ठ मंडळी यांनी जालना येथील पुजारी सच्चिदानंद लल्लन मिश्रा यांना जिअर स्वामी मठाचे मठाधिश केले. तेंव्हापासून ते स्वामी सच्चिदानंद शास्त्री या नावाने ओळखले जातात आणि तेच या मठाचा कारभार पाहत होते. त्या खूनाच्या गुन्ह्यात व्यंकटेश दलसिंगार दुबे अर्थात आजचे जीअर स्वामी मठाचे महंत यांनी सर्वोच्च न्यायालयातून आपल्या विरुध्द दाखल असलेली पोलीस प्राथमिकी रद्द करून घेतली होती.
यानंतर काही जणांनी जिअर स्वामी मठाच्या संपत्तीवर डोळा ठेवून या मठाचा ताबा आपल्या हातात असावा यासाठी व्यंकटेश दलसिंगार दुबेला हाताशी धरुन अनेक खटले दाखल केले.त्यात 9 डिसेंबर 2022 रोजी एका खटल्यात सहधर्मदायक आयुक्त औरंगाबाद यांनी या मठाचे मठाधिश स्वामी सच्चिदानंद शास्त्री यांना निलंबित केले आणि मठाचा कारभार पाहण्याची जबाबदारी सुरजसिंह तुलजारामसिंह माला आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरिक्षकांवर दिली. हा आदेश झालेल्यानंतर एक तातडीची बैठक बोलाविण्यात आली. त्या बैठकीत नवीन महंत पदावर व्यंकटेश दलसिंगार दुबे यांची नियुक्ती झाली. या विरुध्द डॉ.रामरतनसिंह उमरावसिंह बिसेन यांनी उच्च न्यायालयात दिवाणी अर्ज दाखल केला. या अर्जात सच्चिदानंद गुरू केशवाचार्य आणि व्यंकटेश दलसिंगार दुबे उर्फ स्वामी व्यंकटेश गुरू केशवाचार्य यांनी आपले नाव त्या दिवाणी अर्जात जोडले.
याप्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायमुर्तींनी सुरजसिंह तुलजारामसिंह माला यांनी गरज नसतांना घाई केली असा ताशेरा लिहुन कायद्याची पायमल्ली करत नवीन महंताची नियुक्ती झाली असे लिहिले आहे. या सर्व बाबींचा जुना अभिलेख तपासणे आणि त्याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी काही तरी वेळ मिळायला हवा म्हणून सह धर्मादायक आयुक्त औरंगाबाद यांनी 9 डिसेंबर 2022 रोजी महंत श्री.सच्चिदानंद शास्त्री यांच्या निलंबनाला स्थगिती दिली आहे. हा आदेश 8 मार्च 2023 रोजीचा आहे. आता या सत्तासंघर्षात या स्थगिती आदेशाला कसा शह दिला जाईल याचे विविध नमुने काही दिवसांत पाहायला मिळतील.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/01/11/जिअरस्वामी-मठ-श्री-बालाज/