
नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार “ स्तन कर्करोग व जागृती व उपचार अभियान “ राबविण्याचा संकल्प केला आहे. ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून या अभियानाची सुरुवात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात केली. तसेच हे अभियान संपुर्ण महाराष्ट्रभर राबविण्याचा निर्धार केला आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, विष्णुपुरी नांदेड येथे अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे यांनी या अभियानाची सुरुवात केली. या अभियानाचा भाग म्हणून अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे यांचे मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सा शास्त्र विभागप्रमुख डॉ. अनिल देगावकर या अभियानाचे प्रमुख डॉ. विद्याधर केळकर आणि सहायक प्राध्यापक डॉ. बुशरा शाजमीन यांच्या पथकाने नांदेड येथील जिल्हा न्यायालयात स्तन कर्करोग जागृती व उपचार अभियानांतर्गत तपासणी मोहीम राबविण्यात आली.
महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण हे आजघडीला इतर कर्करोगापेक्षा जास्त आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान व उपचार होणे गरजेचे आहे. या कार्यक्रमासाठी न्यायाधीश दलजित कौर यांची उपस्थिती होती. या तपासणी अभियानास न्यायालयातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. डॉ. बुशरा शाजमीन यांनी महिलांना स्तन कर्करोगाविषयी तसेच स्वयं स्तन परिक्षण कसे करावे याबाबत माहिती दिली. तसेच ज्या महिलांना शंका आहे अशा महिलांची तपासणी केली. यावेळी जिल्हा न्यायालयातील जवळपास १०० महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.