नांदेड(प्रतिनिधी)-कोळी जात असतांना अनुसूचित जमातीचा फायदा मिळावा म्हणून कोळीला महादेव कोळी करून फायदा उचलणाऱ्या चार जणांविरुध्द मरखेल पोलीसांनी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यात कट रचून फसवणूक करणे, खोटे कागदपत्र तयार करणे अशी भारतीय दंड संहितेची कलमे जोडली आहेत.
देगलूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल झालेल्या एका प्रकरणानुसार येडूर ता.देगलूर येथील श्रीराम गोविंदराव नागमपल्ले पाटील यांनी तक्रार दाखल केली की, नितल बालाजी पिटलेवाड (20), शितल बालाजी पिटलेवाड (20), बालाजी मारोती पिटलेवाड (42), शंकर सोपान गजलवार (33) या चौघांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या जातीची नोंद कोळी या सदरात असतांना अनुसूचित जमातीच्या महादेव कोळी या जातीच्या अनुशंगाने शासकीय फायदे उचलण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आणि खोटे कागदपत्र वापरून त्याचा दुरपयोग केला.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देगलूर यांनी या प्रकरणात मरखेल पोलीसांना आदेश केल्यानंतर 23 जून 2023 रोजी या चौघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 467, 471, 120(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाच्या अधिपत्रानुसार महादेव कोळी ही जमात नांदेड जिल्ह्यात अस्तित्वातच नसतांना त्या जातीच्या आधारावर फायदे मिळविण्याचा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. आजही तो चालूच आहे.
महादेव कोळी जमातीच्या नावावर फायदे उचलणाऱ्या चार जणांवर मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल