नांदेड(प्रतिनिधी)-30 जून रोजी अर्धापूर शहरात व्यायाम शाळेत बिघडलेले वातावरण रस्त्यावर आले. त्यातून अर्धापूर शहरात दंगल माजली. या दंगलीत पोलीसांच्या एका चार चाकी वाहनासह पाच चार चाकी वाहनांचे नुकसान झाले. अनेक दुचाक्यांचे नुकसान झाले. याप्रकरणात अर्धापूर पोलीसांनी अटक केलेल्या 8 गुन्हेगारांना अर्धापूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मंगेश बिरहारी यांनी 10 जुलै पर्यंत अर्थात 8 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
30 जून रोजी अर्धापूर शहरातील नांदेड रस्त्यावर असलेल्या एका व्यायाम शाळेत दोन युवकांमध्ये बेबनाव झाला. त्या व्यायाम शाळेत एका गटाचे युवक जास्त होते आणि दुसरा मात्र एकटाच होता. तेंव्हा जास्त गटाच्या लोकांनी त्या एकट्याची धुलाई केली. त्यानंतर मारखाल्लेला युवक घरी गेला आणि आपल्या कांही मित्रांना घेवून परत व्यायाम शाळेकडे येत असतांना त्याला मारहाण करणारी मंडळी अर्धापूर शहरातील मारोती मंदिराजवळ त्याला भेटली आणि सुरू झाला राडा. पोलीसांच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद न देत दोन्ही गटांनी दगडफेक सुरूच ठेवली. सायंकाळ झाल्यानंतर विद्युत दिव्ये बंद करून गोंधळ सुरूच ठेवला. या ठिकाणी पोलीसांना एक गोळी झाडावी लागली. एक रबर गोळी झाडण्यात आली आणि एकदा अश्रुधुराची नळकांडी फोडावी लागली. त्यानंतर दंगल शमली.

अर्धापूरचे पोलीस उपनिरिक्षक कपील आगलावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 189/2021 कलम भारतीय दंड संहितेच्या 307, 353, 332, 336, 337, 143, 145, 147, 148, 149, 427, 188, 269,270 प्रमाणे दाखल केला. या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक अशोक जाधव यांच्याकडे आहे. दंगल घडल्यानंतर पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी अर्धापूर येथे भेट दिली आणि घडलेल्या प्रकारासंदर्भाने काय करायला हवे याच्या सुचना अशोक जाधव यांना दिल्या.
अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी जॉनी हुसेन कुरेशी (33),मुद्दसर खान सिकंदरखान (30) रा.बडीदर्गाजवळ अर्धापूर, राम बालाजी गिरी (19), साईनाथ निरंजन काकडे (20) रा.कृष्णानगर अर्धापूर, हनुमान हरी बारसे (19) अशोक भाऊराव कानोडे (34) रा.अहिल्यादेवीनगर अर्धापूर, शंकर धर्माजी करंडे (27)रा. अमृतनगर अर्धापूर, शिवप्रकाश उत्तमराव दाळपुसे (29) रा.अंबाजीनगर अर्धापूर या सर्वांना पकडले. आज 2 जुलै रोजी अशोक जाधव आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी अर्धापूरमध्ये राडा करणाऱ्या या 8 जणांना न्यायालयात हजर करून या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस कोठडी कशी आवश्यक आहे याबाबत सविस्तर मांडणी न्यायालयासमक्ष केली. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश मंगेश बिरहारी यांनी या पकडलेल्या 8 दंगलखोरांना 8 दिवस, अर्थात 10 जुलै 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.