नांदेड (प्रतिनिधी)-70 टक्के अपंग असलेल्या एका व्यक्तीची 0.60 आर शेत जमीन बांबू तोडून पुनम राजेश पवार यांनी वहिती केल्याबद्दलचा अर्ज श्रीराम पवार यांनी पोलीस अधिक्षकांना दिला आहे. तसेच दुसरा अर्ज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिला असून त्यात आमदार राजेश पवार बिना नंबरच्या दुचाकीवर माझ्या घराकडे आणि शेताकडे रात्री-बेरात्री माणसे पाठवत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
आलुवडगाव ता.नायगाव येथील श्रीराम गोविंदराव पवार हे 70 टक्के अपंग व्यक्ती असून प्रहार दिव्यांग संघटना नांदेडचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे दिलेल्या अर्जानुसार टेंभुर्णी येथील गट क्रमांक 179 मध्ये त्यांच्या 60 आर जमीनीत बांबू होते. ते बांबू दि.1 जुलै 2023 रोजी पुनम राजेश पवार यांनी तोडून नागनाथ इंगोले आणि मारोती इंगोले यांच्या शेतात आणून ठेवले आणि माझे शेत वहित केले आहे. पुनम राजेश पवार यांच्यामुळे माझ्या जीवीतास धोका निर्माण झाला असून त्यांच्याविरुध्द योग्य कायदेशीर कार्यवाही करावी असे अर्जात लिहिले आहे.
दुसरा एक अर्ज श्रीराम गोविंदराव पवार यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना दिला आहे. त्यात शेताचा ताबा सोडून दे आणि दिवाणी दावा क्रमांक 41/2021 चालवू नको अशी धमकी दिल्याचे लिहिले आहे. या अर्जात सुध्दा दि.24 जून 2023 रोजी काय घडले याबाबत वर्णन केलेले आहे. तसेच रात्री -बेरात्री माझ्या घराकडे बिना नंबरच्या दुचाकीवर माणसे पाठवून माझ्यावर दहशत निर्माण केली जात आहे असे या अर्जात लिहिले आहे.
आ.राजेश पवार आणि त्यांच्या पत्नीविरुध्द 70 टक्के अंपगाची तक्रार