मुखेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील अत्यंत दमदार पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या अत्यंत कुशल नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेतील दबंग पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे यांनी मांजरी ता.मुखेड येथे तीन जणांना पकडून त्यांच्याकडून दोन मोठ्या तलवारी जप्त केल्या आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक यांनी आपल्या सोबत काम करणारे दबंग पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे यांना देगलूर पोलीस उपविभागात गस्त करण्यासाठी पाठविले असतांना दि.14 जुलै रोजी ते बाऱ्हाळी पोलीस चौकीत पोहचले. तेथील पोलीस उपनिरिक्षक सुनिल सुर्यवंशी आणि आपल्या सोबतचे पोलीस अंमलदार गंगाधर घुगे, शंकर म्हैसनवाड यांना सोबत घेवून मौजे मांजरी येथील मरुमाई मंदिराजवळ रात्री 8 वाजेच्यासुमारास पोहचले. तेथे त्यांनी शिवराम सुधाकर वाघमारे (19), संदीप माधवराव वाघमारे (18) दोघे रा.मांजरी ता.मुखेड यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे 78 सेंटीमिटर लांबीच्या दोन तलवारी सापडल्या. या तलवारी त्यांनी नागनाथ तुकाराम वाघमारे याच्याकडून घेतल्या होत्या असे सांगितले. गोविंदराव मुंडे यांनी तलवारीचा पंचनामा करून दोन आरोपींना पोलीस ठाणे मुक्रामाबादच्या स्वाधीन केले आहे. त्यांच्यावर तेथे भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. आपल्या आदेशाला मुर्तरुप देणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी अभिनंदन केले आहे.
एलसीबीच्या दबंग पोलीस उपनिरिक्षकाने दोन तलवारी पकडल्या