नांदेड(प्रतिनिधी)-भावाने प्रेम विवाह केला म्हणून त्यांच्या घराजवळ यायचे नाही. या कारणावरून वसरणी येथे झालेल्या एका जिवघेणा हल्ला प्रकरणी आणि ऍट्रॉसिटी कायद्याप्रकरणी दोन महिलांसह एका पुरूषाला विशेष न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी 18 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
शंकरनगर वसरणी येथे राहणार युवक करण सुरेश गायकवाड (20) याने दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या भाऊ शुभमने सिमरणकौर या युवतीसोबत प्रेम विवाह केला. ते दोघे शंकरनगर, वसरणी येथील घरात राहत होते. दि.14 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता करण गायकवाड मारोती मंदिराजवळ उभा असतांना देवसिंघने त्याच्या डोक्यात तलवार मारुन त्याला गंभीर जखमी केले. करण गायकवाडला सोडविण्यास आलेले विनोद शास्त्री आणि अनिकेत शास्त्री यांनाही देवसिंघने तलवारीने गंभीर जखमी केले. दोन दिवसानंतर शुध्दीत आल्यावर करण गायकवाडने 16 एप्रिल 2023 रोजी तक्रार दिली. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी जिवघेणा हल्ला, ऍट्रॉसिटी कायदा या सदरात गुन्हा क्रमांक 268/2023 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सध्या पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्याकडे आहे.
आज पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपनिरिक्षक विजय पाटील आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी देवसिंग उर्फ देवांश करणसिंग शिकरवार (27) त्यांच्या पत्नी गुरूप्रितकौर शिकरवार (25) आणि कवलजितकौर अजितपालसिंग नागरे (38) या तिघांना पकडून न्यायालयात हजर केले. न्यायालयात सुरज गुरव यांनी सादर केलेल्या माहितीनुसार न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी तिघांना 18 जुलैपर्यंत अर्थात तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.