नांदेड(प्रतिनिधी)-संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार नांदेडमध्ये अनेकांना खंडणी मागल्याप्रकरणी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा या टोळीप्रमुखाच्या तीन सदस्यांना मकोका विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी 19 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या टोळीतील दोन पुर्वीपासूनच पोलीस कोठडीत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील अत्यंत कायदेशीर पणे चालणाऱ्या पोलीस निरिक्षकांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात 20 एप्रिल 2023 रोजी गुन्हा क्रमांक 129/2023 दाखल झाला. या गुन्ह्यात पुढे मकोका कायद्याची वाढ झाली. या गुन्ह्याच्या संदर्भाने सर्वप्रथम भरतकुमार उर्फ मॅक्सी धरमदास पोपटानी यास 5 जुलै रोजी अटक झाली. त्यानंतर मनप्रितसिंघ उर्फ सोनु सुरजनसिंघ औलख यास 10 जुलै रोजी अटक झाली. या दोघांना न्यायालयाने 19 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविलेले आहे.
या प्रकरणाचे तपासीक अंमलदार पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी तुरूंगात असलेल्या तीन रिंदा टोळीतील सदस्याबद्दल हस्तांतरण वॉरंट मागितले होते. त्यानुसार पोलीसांची ती विनंती मंजुर झाली. आज पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरिक्षक दशरथ आडे आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी तुरूंगातून आणलेले इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी तिरथसिंघ मेजर (35), जगजितसिंघ उर्फ जग्गी दिलबागसिंघ संधू (30) आणि मुक्तेश्र्वर उर्फ गोलु विजय मंगनाळे (25) या तिघांना न्यायालयात हजर केले. या तिघांविरुध्द नांदेडमधील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 15 गुन्ह्यांचा अभिलेख न्यायालयात सादर करण्यात आला. या प्रकरणातील कोणत्या व्यक्तीने कोणाकडून रिंदाने फोन केल्यानंतर किती खंडणी वसुल केली. त्याचे सविस्तर विवरण जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी सादर केले. पुर्वीचे दोन रिंदा टोळीतील सदस्य 19 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. आज आणलेल्या तिघांना सुध्दा न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी 19 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात कोणी खंडणी दिली यांची नावे ट्रॅंकेट (गुप्त) ठेवण्यात आलेली आहेत.