नांदेड(प्रतिनिधी)- प्रधानमंत्री पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या सेतू सुविधा केंद्र चालकाचा परवाना तात्काळ रद्द करण्याची मागणी मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास अडचणी व संकटात न येण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू करण्यात आली.शेतकरी हा दरवर्षी पेरणी केल्यानंतर कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक संकटांमध्ये नुकसान होऊन तो तो आर्थिक संकटात अडचणी सापडल्याने सदैव कर्जबाजारी राहत असल्याने बळीराजा संकटात सापडू नये व तसेच प्रत्येक शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा असावा या करिता प्रधानमंत्री पिक विमा योजना केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात आली. या योजनेमध्ये भर घालून राज्य शासनाने यावर्षीपासून सर्व समावेश पीक विमा योजने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांच्या पिक विम्याचा हप्ता राज्य शासन भरणार असून त्या पोटी केवळ एक रुपाया पिक विमा काढण्याची तरतूद राज्य शासनाने केली असल्याचेही जहागीरदार यांनी नमूद केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर स्वतः शेतकरी अर्ज करू शकतात किंवा बॅंक व विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामार्फत विमा भरून घेतला जातो. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी नेटवर्क मिळत नाही.तर सर्व्हर डाऊन होत असल्याने व तसेच शेतकरी प्रत्यक्ष संगणक साक्षर नाहीत.यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे फॉर्म भरण्यासाठी त्यांना सेतू सुविधा व सीएससी सेंटर तसेच सुविधा केंद्र यांच्याशिवाय पर्याय नसून केंद्र चालक याचा गैर फायदा घेत असून पिक विमा अर्ज भरण्यासाठी प्रति फॉर्म शासनाच्यावतीने 40 रुपये अदा करण्यात येत असतांना शेतकऱ्यांकडून प्रत्येक शेतकऱ्याकडून 150 ते 300 रुपये पर्यंत पैसे उकळले जात असल्याचा आरोप जहागीरदार यांनी केला आहे.
प्रत्यक्षात नांदेड जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक लूट ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून तक्रारी प्राप्त सुविधा केंद्राची चौकशी करून सामूहिक सेवा केंद्र चालक गैरप्रकार करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी.अशा सेतू सुविधा केंद्र चालकांचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
पिक विमा भरण्यासाठी सेतू सुविधा केंद्र करत आहेत शेतकऱ्यांची लुट; मनसेचे निवेदन