संभाव्य पूर परिस्थितीसाठी प्रशासन दक्ष

नांदेड (जिमाका) –  नांदेड जिल्ह्यात गोदावरी, पैनगंगा, मांजरा, आसना, लेंडी, कयाधू, मन्याड या प्रमुख नद्या असून जिल्ह्यातील 337 गावे पूरप्रवण आहेत. जिल्ह्यात पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक संकटे उद्भवतात. राज्यशासनाने एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात येणाऱ्या विविध आपत्तींचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) ची स्थापना केलेली आहे. आगामी पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेऊन मराठवाडा क्षेत्रासाठी एसडीआरएफची धुळे येथील एक तुकडी नांदेड येथे तैनात करण्यात आलेली आहे.

14 जुलै 2023 रोजी रात्री 8 वाजता या तुकडीचे नांदेड येथे आगमन झाले आहे. 15 जुलै  ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीसाठी ही तुकडी नांदेड येथे तैनात राहणार आहे. या तुकडीमध्ये एकूण 36 जणांचा समावेश आहे. यात पोलीस उप निरीक्षक दर्जाचे तीन अधिकारी व बाकी ३३ जवान आहेत. या तुकडीचे नेतृत्व पोलीस निरीक्षक मनोज जितेंद्र परीहार हे करीत आहेत. पोलीस उपनिरीक्षक विजय यशवंत गावंडे, दिनेश मधुकर तायडे व शंकर लक्ष्मण उकांडे हे त्यांना सहाय्य करीत आहेत. या दलाची राहण्याची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथे करण्यात आलेली आहे. ही तुकडी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व  निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे.  समन्वय अधिकारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे हे काम पाहत असून 9422875808  हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *