नांदेड (जिमाका) :- मागील वर्षी सुप्त अवस्थेत गेलेल्या गोगलगायी चालू वर्षातील जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे जमिनीवर आलेल्या आहेत. गोगल गायीच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. यावर्षी ते होऊ नये म्हणुन सुप्त अवस्था संपुन जमीनीवर आलेल्या गोगलगायींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. गोगलगायीं अंडे टाकण्याच्या अगोदर नियंत्रण केले तर चालु हंगामातील सोयाबीन पिकाचे नुकसान टाळता येईल, असा सल्ला कृषि शास्त्रज्ञांनी दिला आहे.
जमिनीतील सुप्तावस्था संपुन वर आलेल्या गोगलगायी पंधरा दिवसात समान आकाराच्या गोगलगायींशी संग करुन पंधरा दिवसानंतर जमिनीच्या खाली प्रत्येक गोगलगाय 100 ते 150 अंडी टाकतात. या अंडयाद्वारे गोगलगायीची पुढील वर्षाची पिढी तयार होते. त्यामुळे अंडी टाकण्याच्या अगोदर जर आपण गोगलगायींचे नियंत्रण केले तर चालु हंगामातील सोयाबीन पिका बरोबरच पुढील वर्षातील सोयाबीन पिकाचे संरक्षण होण्यास मदत होईल. त्यासाठी नियंत्रण हवे, सुप्त अवस्थेतील गोगलगायीने डोकेवर काढले आहे. त्यामुळे आताच गोगलगायीचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. तरच सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान टळेल.