लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिसवे यांचे आदेश
नांदेड(प्रतिनिधी)-सोशल मिडीयावर रिल तयार करून प्रसारीत करण्याचे फॅड सध्या सर्वात जास्त जोरात आहे. हे करतांना आपण पोलीस असल्याचे लक्षात ठेवण्याची गरज आहे. अशा आशयाचा एक कार्यालयीन आदेश लोहमार्ग मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिसवे यांनी जारी केले आहे. यासाठी प्रत्येक शाखा प्रमुखाने तसे हमीपत्र लिहुन घ्यायचे आहे. खरे तर हा आदेश महाराष्ट्र पोलीस दलात सुध्दा लागू होण्याची गरज आहे.
लोहमार्ग मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिसवे यांनी जुलै महिन्यात जारी केलेल्या एका कार्यालयीन आदेशानुसार सर्व लोहमार्ग पोलीस ठाणे आणि शाखा प्रभारी अधिकारी हे सर्व 24 तास कर्तव्यावर असतात परंतू पोलीस खात्याची किंवा पोलीस आयुक्त कार्यालयाची कोणतीही पुर्व परवानगी न घेता पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार आपला गणवेश परिधान करून अनाधिकृतपणे सोशल मिडीया जसे युट्युब, इंस्टाग्रॉम, फेसबुक आणि अशा इतर अनेक माध्यमांमार्फत वेगवेगळ्या विषयावर व्हिडीओ बनवतात आणि आपले मत प्रदर्शीत करतात. ही कृती पुर्णपणे बेकायदेशीर असून पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणारी आहे.
या संदर्भाने लोहमार्ग पोलीस आयुक्त रविंद्र सिसवे यांनी सर्व पोलीस ठाणे आणि शाखा प्रमुखांना सुचित केले आहे की, त्यांचे मातहत पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे अशा बेकायदेशीर कृतीत सहभागी होणार नाहीत. याची दक्षता घ्यावी. अशी कृती कोणी करत असेल तर त्यांच्याविरुध्द कडक खातेनिहाय कार्यवाही होईल. जो कोणी पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार अशा सोशल मिडीया प्रकरणांमध्ये पोलीस गणवेशाचा वापर करून आपली उपस्थिती दाखवली याची जबाबदारी त्या विभागाच्या किंवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यावर निश्चित केली जाईल.
या आदेशासह लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी एक हमी पत्र सुध्दा पाठवले आहे. ज्यामध्ये प्रत्येक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदाराने पोलीस गणवेशात मी कोणत्याही सोशल मिडीया माध्यमातून व्हिडीओ तयार करणार नाही किंवा सामाजिक मत प्रदर्शीत करणार नाही असे या हमीपत्रात स्वमर्जीने लिहुन द्यायचे आहे.
लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ.रविंद्र सिसवे यांनी जारी केलेला आदेश खरे तर राज्यभरातील पोलीस विभागाला लागू व्हायला हवा. परंतू डॉ.रविंद्र सिसवे हे लोहमार्ग मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत त्यामुळे सध्या तरी हा आदेश लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसाठी तर नक्कीच बंधनकार आहे.
पोलीसांनी गणवेशात सोशल मिडीयावर व्हिडीओ टाकणाऱ्यांवर कार्यवाही होणार