नांदेड(प्रतिनिधी)-तृतीयपंथी कल्याणकारी मंडळ सदस्य व राज्य निवडणूक आयोग यांचा निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांनी सर्व तृतीयपंथी आणी दिव्यांग यांना आवाहन केले आहे की सध्या मतदार नोंदणी अभियान सुरू आहे आपण मतदाता होण्यासाठी लवकरात लवकर आपले नाव नोंदवावे आणि लोकशाहीमध्ये आपला सहभाग नोंदवावा. निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मान्यवरांची मदत घेतली आहे. आपल्या देशाची अनेक गोष्टींपैकी जमेची बाब म्हणजे ‘लोकशाही’. या लोकशाहीला बळकट करणारी प्रणाली म्हणजे ‘मतदान’. भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. तृतीयपंथी यांना अनेक समस्यांना समोर जावे लागते जर आपण एकत्र येऊन लोकशाहीमध्ये मोठा सहभाग नोंदवू तरच आपला आवाज सभागृह आणि सरकारपर्यंत पोहोचेल यासाठी आपण लोकशाहीमध्ये मतदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला व आपल्या समाजाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे. निवडणुका हा लोकशाही प्रक्रियेचा कणा आहे असे मत डॉ. सान्वी जेठवाणी यांनी मांडले.
या मतदार नोंदणी अभियानात युवक व समाजाच्या सर्व घटकांनी पुढे येऊन नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. देशाचे भवितव्य आपल्या मतावर अवलंबून आहे. तरी सर्वांनी प्रतिज्ञा करू ‘मी मतदान करणारच’. आपली लोकशाही बळकट, सदृढ व सक्षम करण्यासाठी, देशाच्या विविधांगी विकासाला चालना देण्यासाठी, गती देण्यासाठी देशाचा नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावावा़ निवडणुकीत आता लिंग भेदभाव असं काही राहिला नाही आपणही मतदाता आहात देशाच्या नागरिक आहात म्हणून आपण हे मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. मतदान हा आपला हक्क तर आहेच पण ती आपली जबाबदारी देखील आहे. हे समजून घेऊन मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे आहे. लोकशाहीमध्ये जबाबदार नागरिक म्हणून देशाचे कायदे, नियम, शिस्त यांचे पालन केले पाहिजे. प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने सकारात्मक मतदान करून लोकशाही सुदृढ आणि बळकट करणे ही आपली जबाबदारी आहे. भारताची राज्यघटना तयार करताना देशातील प्रत्येक नागरिकास मतदानाचा हक्क असावा असे धोरण ठरवले. सन 2014 च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. 2014 मध्ये या तिसऱ्या वर्गवारीमध्ये 918 मतदारांची नोंद करण्यात आली. पाच वर्षांनी करण्यात आलेल्या नोंदीमध्ये हा आकडा दुप्पटीने वाढला असून आणखीन मतदारांनी पुढे यावं आणि आपली नोंदणी आजच करावी. मग त्या तृतीयपंथी मागं का राहिला पाहिजे?