मोबाईल चोरांना विमानतळ पोलीसांनी काही तासातच गजाआड केले

नांदेड(प्रतिनिधी)-एका मजुराला मारहाण करून त्याचा मोबाईल बळजबरीने घेवून जाणाऱ्या चार जणांना विमानतळ पोलीसांनी काही तासातच पकडले. त्या चौघांमध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे. आज न्यायालयाने तिघांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.
मंगलसिंग झमर टेकाम हा मध्यप्रदेशातील युवक नांदेडला सांगवी ब्रिजजवळ असलेल्या टीनशेडमध्ये राहतो. तो के.पी.एल.कंपनी नोयडामध्ये मजुर म्हणून काम करतो. 22 जुलैला रात्री सर्व कामगार झोपी गेले होते. रात्री 9.30 वाजेच्यासुमारास मंगलसिंग लघवीसाठी उठला तेंव्हा चार जणांनी त्याच्याकडील मोबाईल बळजबरीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्याने विरोध केला असता सर्वांनी मिळून त्याला मारहाण केली आणि मंगलसिंगचे सहकारी त्याच्या मदतीला आले तेंव्हा चोरले पळून गेले. मंगलसिंगचा दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी पळवला होता. या प्रकरणी 23 जुलैच्या मध्यरात्रीनंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 34 नुसार गुन्हा क्रमांक 252/2023 दाखल झाला.
पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरिक्षक भोसीकर, पोलीस हवालदार दारासिंग राठोड आणि वैजनाथ कानगुले यांनी मंगलसिंगचा मोबाईल चोरणाऱ्या उदय उर्फ लड्या भगवान हातांगळे (19) रा.लक्ष्मीनगर नांदेड, रवि यलप्पा आरोटे (22) रा.केरुर ता.बिलोली ह.मु.गंगानगर सोसायटी नांदेड, दिपक मधुकर गायकवाड(23) रा.शिवनगर नांदेड आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा चौघांना पकडले. मंगलसिंगचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आज तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *