
नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्री 11 वाजेच्या सुमारास वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 43 वर्षीय व्यक्तीचा खून झाला. मारेकऱ्याचे नाव उघड केले इतवारा पोलीसांनी परंतू त्याला ताब्यात घेतले नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वात टीम वर्कमुळे काही तासातच मारेकरी पोलीसांच्या ताब्यात आला. ही प्रक्रिया मात्र प्रशंसनिय आहे.
काल रात्री 11 वाजेच्यासुमारास जुना मोंढा भागातील सिडकोकडे जाणारा रस्ता आणि वजिराबादकडे येणारा रस्ता या ठिकाणी ऍटो थांबतात त्या ठिकाणी पृथ्वीसिंह हरीसिंह तोमर (43) या व्यक्तीचे बिल्लासिंग उर्फ अमरसिंग हिरासिंग चिट्टोलीया (35) या व्यक्तीसोबत भांडण झाले.बिल्लासिंगने आपल्या जवळील खंजीरने पृथ्वीसिंगच्या छातीमध्ये, पोटामध्ये, डोक्यामध्ये आणि कानामागे जिवे मारण्याच्या उद्देशाने वार करून त्याला ठार मारले. अशी तक्रार मयत पृथ्वीसिंहचे बंधू प्रतापसिंह तोमर यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात दिली. वजिराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 308/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 4/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.एस.मुत्येपोड यांच्याकडे देण्यात आला. प्राप्त झालेल्या माहितीनुसार पृथ्वीसिंह तोमर यांचा भजे-पावचा गाडा जुन्या मोंढा येथे आहे. तसेच बिल्लासिंग यांचा व्यवसाय औषधी विक्री करण्याचा आहे.
घटना घडली तेंव्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, शहर उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, इतवाराचे पोलीस उपअधिक्षक सुशीलकुमार नायक यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी भेट दिली. सर्व जण आप-आपल्या परीने प्रकरणाची माहिती काढत असतांना मारेकऱ्याचे नाव इतवारा पोलीसांना सर्वात अगोदर समजले. ते नाव बिल्लासिंग उर्फ अमरसिंग हिरासिंग चिट्टोलीया असे आहे. परंतू त्याला ताब्यात घेण्याचे भाग्य स्थानिक गुन्हा शाखेला प्राप्त झाले. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलीस टिमने खून करणाऱ्या मारेकऱ्याला काही तासातच ताब्यात घेतले ही प्रक्रिया प्रशंसनिय आहे.