नांदेड(प्रतिनिधी)-सचखंड श्री हजूर साहिब ते गुरूद्वारा लंगर साहिब या रस्त्यावर पादचारी मार्गावर सुध्दा व्यापाऱ्यांनी अतिक्रमण करून भाविकांना जाण्या-येण्यासाठी तो रस्ता बंद केला होता. काल दि.28जुलै आणि आज 29 जुलै अशा दोन्ही दिवशी महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने या रस्त्यावरील अतिक्रमणे पुर्णपणे काढून रस्त्याला श्वास दिला आहे. या संदर्भाने सरदार जगदिपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका सुध्दा दाखल केलेली आहे.
काल आणि आज मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अपर आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त पंजबाराव खानसोळे यांच्या मार्गदर्शनात नियंत्रक अतिक्रमण पथक गणेश शिंगे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत सचखंड श्री हजुर साहिब ते गुरूद्वारा लंगर साहिब या मार्गावर दोन दिवसांत खुप मोठ्या प्रमाणात पादचारी रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण पुर्णपणे काढून घेण्यात आले. विशेष म्हणजे विना पोलीस संरक्षणाच्या मनपा पथकाने केलेले हे काम प्रशंसनिय आहे.
नांदेडला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जाण्या-येण्यासाठी जो पादचारी मार्ग (फुथपाथ) आहे. त्या पादचारी मार्गावर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली. काहीनी टीनशेड उभारले. त्यामुळे भाविकांच्या या रस्त्यावर चालण्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे अशी अनेक निवेदने स्थानिक प्रशासनाला दिल्यानंतर सरदार जगदिपसिंघ मोहनसिंघ नंबरदार यांनी उच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल केली होती. या रिट याचिकेत उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला जाब विचारला आणि पुढील तारखेला प्रत्यक्ष हजर राहुन शपथपत्र देण्याचे आदेश सुध्दा दिले होती अशी माहिती जगदीपसिंघ नंबरदार यांनी दिली.
सचखंड श्री हजुर साहिबजी येथे दर्शनास जातांना पादचारी रस्ताच उपलब्ध नव्हता. हाच प्रकार पुढे देणा बॅंक चौक ते गुरूद्वारा लंगर साहिब या परिसरात पण होता. मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी केलेली ही अतिक्रमण हटावची मोहिम प्रशंसनिय आहे.

