नांदेड(प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून सततचा पाऊस होत असल्याने भोकर तालुक्यातील शेतीच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी व भोकर तालुका ओला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावे अशी मागणी शिवसेना(ठाकरे) उपजिल्हाप्रमुख सतिश देशमुख यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील काही दिवसांपासून भोकर तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या पावसात शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. सुरूवातीला पेरण्या उशीरा झाल्यामुळे शेतकरी अगोदरच संकटात सापडला होता. एकीकडे पेरण्या झाल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतात असणारे कोवळे पिके या पावसात वाहुन गेली. यामुळे पिकासह शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडे आता आत्महत्येशिवाय आता दुसरा पर्याय उरला नाही. त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे टाकले आहे. अगोदरच शेती मालाला योग्य भाव मिळाला नसल्याने शेतकरी पुर्णता: कोलमडला आहे.
नदीकाठच्या गावात नदीचे पाणी शिरल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते. याचबरोबर नदीकाठच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांसह शेतीतील माती वाहुन गेली. त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, याचबरोबर नदीकाठच्या गावातील नागरीकांना इतरत्र स्थलांतर करावे अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख सतिश देशमुख, तालुकाप्रमुख माधव वडगावकर, तालका संघटक संतोष आलेवाड, पांडूरंग वर्षेवार, माजी जि.प.सदस्य सुनिल चव्हाण, मारोती पवार, बाबूराव खेदानपुरे, जगदीश गडदे यांच्यासह आदींचे निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
भोकर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून 50 हजारांची मदत द्या-सतिश देशमुख