
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील काही युवकांनी पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांच्यासोबत काम करून नंदगिरीच्या किल्यावर काल रविवारी साफसफाई केली. त्या साफसफाईमुळे किल्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे. अनेक युवकांच्या अनेक संघटना आहेत. त्या सर्वांनी एकत्रित येवून नंदगिरीच्या किल्याला दत्तक घेतले तर हा किल्ला पर्यटनस्थळ झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही.
आजच्या ज्यांचे वय 65 वर्ष आहे. ती मंडळी 45 वर्षापुर्वी या किल्यामध्ये अभ्यास करायला जात होती. सर्वत्र हिरवीगार झाडे, किल्यात दक्षीणेकडे असलेली एक छत्री येथे बसल्यानंतर गोदावरी नदीचे विहंगम दृष्य दिसते. सोबतच वेगवेगळ्या पायऱ्याने बुरजापर्यंत जाण्याच्या वेगवेगळ्या सोयी, त्यातील वेगवेगळी खंदके हा एक आकर्षणाचा विषय होता. त्यावेळी सुध्दा सांगितले जायचे की, ज्या नंदगिरीच्या किल्यात दक्षिण-पश्चिम भागात एक खंदक आहे ते खंदक थेट कंधारच्या किल्यापर्यंत जाते. त्या काळी त्यातून काही शेळ्यापण सोडण्यात आल्या होत्या. परंतू त्याचा पुर्ण माग काही लागला नाही.या किल्यात बिना ईलेक्ट्रीक साधणांचा चालणारा एक सुंदर कारंजा आहे तो आज बंद पडला आहे.सन 2007 मध्ये हा कारंजा तत्कालीन पोलीस अधिक्षक डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी सुरू करायला लावला होता. काहीही असो पण नांदेडच्या सुंदरतेत नंदगिरीचा बुरूज एक महत्वाचा टप्पा आहे.

कालांतराने काही ना काही कारणाने या किल्यात घरे तयार झाली. बाहेर किल्याच्या भिंतीला लागून काही लोकप्रतिनिधींनी आपल्या चमच्यांची घरे बनवली. पण आजही उत्तर, पुर्व आणि दक्षीण भागात या किल्याच्या तिन्ही बाजूने घरे तयार झालेली नाही. फक्त पश्चिम बाजूला बरीच घरे तयार झाली आहेत. नांदेडकरांच्या पाण्यासाठी या किल्यातच फिल्टर बसविण्यात आले आहे. त्यामुळे हा किल्ला घरे आणि शासकीय कार्यालयांनी वेढला गेला. एक शाळा पण त्या किल्याच्या भिंतीसोबत उत्तर दिशेकडे तयार झाली आहे. त्यामुळे किल्याचे मुळ भव्य दर्शन थोडेसे अवघड वाटते.
गडांचा प्रेमी असलेला व्यक्ती पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांची नियुक्ती नांदेडला झाली. दोन आठवड्यापुर्वीच त्यांनी या किल्याची पाहणी केली आणि आपल्या व्हाटसऍप स्टेटसवर किल्याचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली तेंव्हा विर सैनिक गु्रप नावाच्या युवक संघटनेने त्यांच्याशी संपर्क साधला. त्या युवकांचा प्रतिसाद पाहुन पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव यांनी आपल्या गडप्रेमाप्रमाणे त्यांना प्रतिसाद दिला. रविवार दि.30 जुलै रोजी पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, त्यांची सुकन्या सई आणि सुपूत्र रुद्र यांना सोबत घेवून विर सैनिक गु्रपला प्रतिसाद दिला आणि रविवारी या किल्यात वाढलेली तणे, झाडे आदी तोडून घेतली. त्यामुळे या किल्याच्या देखण्या स्वरुपात आणखीच भर पडली.
विर सैनिक गु्रप प्रमाणे इतर युवक संघटनांनी सुध्दा यात भाग घेतला पाहिजे. युवक शक्ती ज्या पध्दतीने आपण घेतलेल्या वश्याला पुर्णत्वाकडे नेते ती शक्ती इतरांमध्ये नसते. जग काय म्हणेल, समाज काय म्हणेल याला युवक भित नाहीत. त्यांना कल्पना आवडली तर ती प्रत्यक्षात आणण्यामध्ये युवक आपल्या स्वत:ला झोकून देत असतात. आपल्या संघटनेच्या नावावर वेगवेगळी कामे करणाऱ्या युवकांनी नंदगिरीच्या किल्याला आपल्याला पुर्व वैभव प्राप्त करून द्यायचे आहे हा वसा घेण्याची गरज आहे. विर सैनिक गु्रपमधील युवक आणि इतर संघटनेचे युवक एकत्र आले तर जास्तीत जास्त एका आठवड्यात नंदगिरीच्या किल्याला पुर्व वैभव प्राप्त होईल म्हणून वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा शहरातील आणि जिल्ह्यातील युवक संघटनांना आवाहन करत आहे की, विर सैनिक गु्रपप्रमाणे आपण सुध्दा या नवीन सुधारणेच्या कामात आपला सहभाग दाखवावा आणि नंदगिरीच्या किल्याचे किल्लेदार होण्याचे वैभव प्राप्त करावे.
