नांदेड(प्रतिनिधी)-काल रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वस्त धान्य भरलेले दोन ट्रक आणून उभे केले होते पण आज सुर्योदय होण्याअगोदरच ते ट्रक तेथून बेपत्ता झाले आहेत. ट्रक आले आणि गेले ही घटना पोलीस ठाण्याच्या सीसीटीव्हीमध्ये तर आहेच ना.
काल दि.1 ऑगस्ट रोजी सुर्यास्त झाल्यानंतर ग्रामीण पोलीसांनी ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.ई.9173 आणि ट्रक क्रमांक एम.एच.26 बी.ई.9597 असे दोन ट्रक पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणमध्ये आणले. याबद्दल नांदेड ग्रामीण येथील अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता या दोन ट्रकमध्ये स्वस्त धान्य भरलेले आहे असे सांगण्यात आले. माहिती विचारली असता कार्यवाही पुर्ण झाल्यावर माहिती देवू असे सांगितले.
आजचा सुर्योदय झाल्यानंतर या दोन ट्रकबद्दल माहिती घेतली असता आज ते दोन ट्रक पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या आवारात उभे नाहीत. याचा अर्थ आजचा सुर्योदय होण्याअगोदरच हे दोन स्वस्त धान्य भरलेले ट्रक तेथून गायब झाले आहे. कोणत्या पध्दतीची जादुगारी झाली याबद्दल काही माहिती मिळाली नाही. पण एवढे नक्की हे दोन ट्रक नांदेड ग्रामीण पोलीस ठण्यात आले आणि गेले. याला सीसीटीव्हीने तर कैद केले असणारच.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातून दोन स्वस्त धान्य भरलेले ट्रक गायब