
नांदेड(प्रतिनिधी)-अधिक मासमध्ये दान-धर्म केल्याने अधिकचे पुण्य प्राप्त होते. या महिन्यात पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी सत्संग हा अधिक महत्वाचा असतो. अनुष्ठाण, तिर्थ यात्रा, दान-धर्म या पेक्षाही या महिन्यात सत्संग केल्यानंतर अधिकचे पुण्य प्राप्त होते असा उपदेश श्री.श्री.श्री.1008 जगदगुरू डॉ.चंद्रशेखर महास्वामीजी, काशीपीठ यांनी आयोजित केलेल्या सत्संगात भक्तांना केला.
उद्योजक सुमित गणपतराव मोरगे यांनी अधिक मासनिमित्त काशी जगदगुरू यांच्या सत्संगाचे आयोजन शहरातील भक्ती लॉन्स येथे दि.3 ऑगस्ट रोजी आयोजित केले होते. या सत्संगासाठी श्री.108 सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदा, श्री.108 डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, श्री.108 वेंदाताचार्य दिगांबर शिवाचार्य महाराज वसमत श्री.108 नंदकिशोर शिवाचार्य महाराज सोनपेठ, श्री.108 अमृतेश्र्वर शिवाचार्य महाराज, श्री.108 विश्र्वचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टीकर आणि श्री.108 बसवलिंग शिवाचार्य महाराज कवळास या गुरूवर्यांची धर्मपिठावर उपस्थिती होती.यावेळी सुरूवातीला काशी जगदगुरू यांची पादपुजा श्रीमती वंदना गणपतराव मोरगे, उद्योजक सुमित गणपतराव मोरगे, सौ.ऐश्वर्या मोरगे,कु.विनीशा सुमित मोरगे कुटूंबियांनी पुजा करून आशिर्वाद घेतला. यावेळी काशी जगदगुरू आर्शिवचन देत असतांना म्हणाले की, अधिक मास महिन्याचे महत्व त्यांनी यावेळी भक्त मंडळींना सांगितले, मागील काही दिवसांपुर्वी शिवाचार्यांनी अखंड शिवनाम सप्ताह आयोजित केला होता. या सप्ताहाला मी येवू शकलो नाही याची उणीव नांदेडकरांना भासत होती. ती उणीव मोरगे कुटूंबियांनी आज भरून काढली. अधिक मासमध्ये सुर्यसंक्रमण होत नाही. म्हणून या मासमध्ये कुठलेही लौकिक कार्य करता येत नाहीत. हा मास तीन वर्षानंतर एकदा येत असतो. याला मनमास असे नाव आहे. देवतांनी भगवतांची प्रार्थना केली आणि भगवंत प्रसन्न झाले. भगवंतांनी विचारले की, तुम्हाला काय पाहिजे यावेळी मनमास म्हणाला की, मला पैसा नको, संपत्ती नको मला मान, सन्मान पाहिजे असे म्हटल्यानंतर भगवंतांनी माझे नाव मी तुला देतो असे सांगून त्यांनी पुरूषोत्तम असे नाव दिले. या पुरूषोत्तम मासचे वैशिष्ट असे आहे की, या महिन्यात अधिकची भक्ती केल्यानंतर अधिक पुण्य प्राप्त होते. या महिन्यात तिर्थ यात्रा, तिर्थस्नान, 12 ज्योर्तिलिंग दर्श, अनुष्ठाण यात जेवढे पुण्य प्राप्त होत नाहीत त्यापेक्षा अधिक कितीतरी पटीने सत्संग केल्याने पुण्य प्राप्त होते. यामुळे या महिन्यात प्रत्येकाने सत्संग करावा आणि पुण्य प्राप्त करून घ्यावे असा उपदेश काशी जगदगुरू डॉ.चंद्रशेखर महास्वामीजी यांनी भक्तमंडळीला केला.
