नांदेड(प्रतिनिधी)-अधिक श्रावण मासाच्या द्वितीयेच्या दिवशी सचखंड गुरूद्वारा बोर्डाचा प्रशासक पदाचा पदभार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्विकारला. गुरूवारी सायंकाळी सहपत्नीक त्यांनी सचखंड श्री.हजूर साहिबजींच्या दरबारात हजेरी लावून आशिर्वाद प्राप्त केले.
गुरूद्वारा बोर्डाच्या प्रशासक पदावर माजी पोलीस महासंचालक डॉ.पी.एस.पसरीचा यांची नियुक्ती शासनाने काही अवधीसाठी केली होती. या अवधीत गुरूद्वारा बोर्डाच्या निवडणुका व्हाव्यात आणि नवीन पदाधिकारी गुरूद्वारा बोर्डाचे कामकाज सांभाळतील असा त्या नियुक्तीमध्ये उल्लेख होता. त्यानंतर डॉ.पसरीचा विरुध्द उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली. ज्या याचिकेत उच्च न्यायालयाने कोणतेही धोरणात्मक निर्णय डॉ.पसरीचा यांनी घेवू नयेत असे आदेश दिले. तरीपण प्रशासक पदाचा कारभार करतांना डॉ.पसरीचा यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. त्यात पुन्हा नवीन वाद निर्माण झाले, अर्ज झाले आणि शासनाने नवीन निर्णय घेतला.
अधिक श्रावण मासाच्या द्वितीयेला 3 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी सुर्याचा आश्लेशा नक्षत्रात प्रवेश होत असतांनाच्या काळात गुरूद्वारा बोर्डाचा पदभार नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी सहपत्नीक सचखंड श्री हजुर साहिबजी यांच्या दरबारात हजेरी लावून आपल्या कामात यश यवो अशी प्रार्थना करून अशिर्वाद मागितले. श्री.पंचप्यारे साहिबान यांनी अभिजित राऊत, त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांच्या बालकाला आशिर्वाद प्रदान केले.
