नांदेड(प्रतिनिधी)- जिल्हा परिषदमध्ये नोकरी करणे म्हणजे या विभागात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण आपल्या घरीच आहोत असे वाटत असते. पदाधिकाऱ्यांच्या जोरावर अधिकारी आणि कर्मचारी वाटेल त्या वेळेला कार्यालयात येतात. पण नुतन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी या पध्दतीला तोडण्याची सुरूवात केली आहे. जवळपास दीड शेकडा अधिकारी-कर्मचाऱ्यांना उशीरा देण्यासाठी नोटीस जारी केल्याने जिल्हा परिषद कार्यालयात खळबळ माजली आहे.
शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना कामासाठी पाच दिवसाचा आठवडा केल्यानंतर कार्यालयाची वेळ सकाळी पावने दहा ते सायंकाळी सहा पर्यंत केली असताना नांदेड जिल्हा परिषदेतील कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसल्याबाबतच्या तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर त्या स्वत: कार्यालयात वेळेवर हजर राहत आहेत.मागील आठवड्यात नांदेडला रूजू झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी विभाग प्रमुखांना कार्यालयात वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर करनवाल यांनी 26 जुलै रोजी स्वाक्षरीची वेळ संपल्यानंतर सकाळी दहा वाजता कर्मचारी पाठवून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे हजेरीपट मागवून घेतल्यानंतर कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या नगण्य दिसल्यानंतर त्या अवाक झाल्या व दररोज सकाळी हजेरीपट आपल्याकडे मागवत असल्याचे सांगण्यात येते. हजेरीपट मागवल्यानंतर कार्यालयात वेळेवर न येणाऱ्या 150 च्यावर कर्मचाऱ्यांना त्यांनी कारणे दाखवा नोटीस दिली आहे.यामध्ये पंचायत विभागातील -11, स्वच्छ भारत मिशन-4, वित्त विभाग-24, आरोग्य विभाग-15, बांधकाम विभाग-9, जलसंधारण विभाग-4, एनआरएचएम-2, कृषी विभाग-8, समाजकल्याण विभाग-11, शिक्षण विभाग प्राथमिक-28, शिक्षण विभाग माध्यमिक-3, सर्व शिक्षा अभियान-4, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयातील 9 व अन्य दोन विभागातील एका कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्याचे सांगण्यात आले. या वृत्ताला खात्रीलायक सुत्रांनी दुजोरा दिल्यानंतर वास्तव न्युज लाईव्हने ही बातमी प्रसिध्द केली आहे.जिल्हा परिषद येथे सर्वच विभागात कर्मचाऱ्यांची संख्या आता अधिक दिसत आहे. ऐरवी मात्र अनेक टेबलवर कर्मचारी उपस्थित राहायचे नाहीत. आता कर्मचारी आणि विभागप्रमुखही विनाकारण जिल्हा परिषदेच्या बाहेर जात नसल्याचे दिसून येत आहे. विभागप्रमुखही आपल्या कार्यालयात दिवसभर ठाण मांडून बसत आहेत.
जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला दीड शेकडा कर्मचाऱ्यांना झटका