नांदेड,(प्रतिनिधी)-रेल्वे स्थानकातील वाहन तळामधून चोरी झालेल्या दुचाकीचा गुन्हा नोंदवताना वाहन तळाची पार्किंग रक्कम घेणाऱ्या वर काही दोष ठेवण्यात आलेला नाही. याबद्दल अर्जदाराने आश्चर्य व्यक्त केले आहे.
पूर्णा येथील अफरोज पठाण यांची दुकान वाघी रोड येथे आहे. ते दररोज सकाळी पूर्णा येथून रेल्वेने नांदेडला येतात आणि वाहन तळात ठेवलेली आपली दुचाकी गाडी घेऊन दुकानावर जातात पुन्हा सायंकाळी दुकान बंद करून आपली दुचाकी गाडी वाहन तळात ठेवतात आणि आपल्या घरी पूर्णला जाताना रेल्वेने प्रवास करतात.
दिनांक 1 ऑगस्ट रोजी त्यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम एच 22 एक एफ 9077 ही रेल्वेच्या पार्किंग मध्ये उभी केली. त्यांच्याकडे पार्किंग साठी लागणाऱ्या पैशांची पावती आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी ते आपली दुचाकी गाडी घेण्यासाठी आले असताना पार्किंग मधून दुचाकी गाडी गायब झाली होती. त्यावेळी पार्किंगवर असलेले कृष्णा बालाजी मोरे यांच्यासोबत फिरून सर्वत्र दुचाकी शोधली परंतु ती मिळाली नाही. याचा अर्थ ही गाडी कोणीतरी चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत तक्रार दिल्यानंतर वजीराबाद पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 379 नुसार पुन्हा क्रमांक 320/2023 दाखल केला आहे.
रेल्वेच्या वाहन तळाच्या पार्किंग ठेकेदाराची काहीच जबाबदारी नाही काय ? त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सीसी कॅमेरे लावलेले नाहीत. जरी लावले नसतील तरी गाडी घेऊन जाताना पार्किंगचा माणूस पावती घेतो. मग अफरोज पठाणची गाडी गेली तेव्हा त्याची पावती का विचारली नाही. पार्किंगचे पैसे घेताना पहिलेच घेतले जातात परंतु गाड्यांची जबाबदारी कोणाची हा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. अशा प्रकरणात पार्किंग ठेकेदाराला सह आरोपी करण्यात यायला हवे परंतु वजीराबाद पोलिसांनी त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही आणि फक्त अज्ञात चोरट्याविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.