पत्रकार गोपाळ देशपांडे यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)-येथील दै.सत्यप्रभाचे वरिष्ठ उपसंपादक ज्येष्ठ पत्रकार गोपाळ ललितादासराव देशपांडे यांचे बुधवारी दि.9 ऑगस्ट रोजी सकाळी 7 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 55 वर्ष होते.

शहरातील मालेगाव रस्त्यावर संत गजानन महाराज मंदिर परिसर लगत वास्तव्यास असलेले पत्रकार गोपाळ देशपांडे हे नित्याप्रमाणे बुधवारी सकाळी मॉर्निंगवॉकसाठी गेले होते. परत येताना त्यांना वाटेतच हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पश्‍चात पत्नी,दोन भाऊ,एक बहिण, दोन मुले असा परिवार आहे.
गोपाळ देशपांडे यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात तरुण भारत या वर्तमानपत्रापासून केली. त्यानंतर त्यांनी काही काळ दै.लोकपत्र, दै.एकमत,उद्याचा मराठवाडा या वर्तमानपत्रात काम केले. मागील अनेक वर्षापासून दै.सत्यप्रभामध्ये वरिष्ठ उपसंपादक या पदावर कार्यरत होते. डी.गोपालन या नावाने त्यांनी लिहिलेल्या अनेक बातम्या त्या-त्या काळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. आरोग्याकडे विशेष लक्ष देणारे गोपाळ देशपांडे यांनी   व्यसनमुक्तीसाठी अनेकांना प्रोत्साहित केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने नांदेडच्या वृत्तपत्रसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *