शिष्टमंडळाच्या वतीने प्रशासनाशी चर्चा
नांदेड ( प्रतिनिधी)-विनामोबदला कोणतेही कामे लावू नयेत. जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून दिवाळी भाऊबीज देण्यात यावी. यासह अनेक मागण्यांसाठी क्रांती दिना निमित्ताने सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने क्रांती दिनी दि. ९ रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने प्रशासनास निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सुरू झालेला मोर्चा दुपारी १२ वाजता जिल्हा परिषदेवर धडकला. आशा आणि गटप्रवर्तक ताईंना विना मोबदला कोणतेही कामे लावू नयेत. जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून दिवाळी भाऊबीज देण्यात यावी. वेतन चिठी देण्यात यावी तसेच मानधन दर महा ७ तारखेच्या आता बँक खात्यावर जमा करावे. मागील सर्व थकीत बिले देण्यात यावीत. शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा आणि सर्वोच न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे २६ हजार रुपये मानधन देण्यात यावे. दि. ४ ऑगस्ट रोजी मोर्चा असल्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले असताना त्यांनी जाणीवपूर्वक मांडवी येथे कार्यक्रम आयोजित करून तिकडे जाण्यास प्राधान्य दिल्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. शिष्टमंडळा सोबत उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चर्चा करून निवेदन स्वीकारले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ कामगार नेते कॉ. विजय गाभणे जिल्हा अध्यक्षा कॉ. उज्वला , पडलवार, सरचिटणीस कॉ. गंगाधर गायकवाड आदींनी मोर्चास संबोधित केले. मोर्चास पाठिंबा देण्यासाठी घरेलू कामगार संघटनेच्या अध्यक्षा कॉ. करवंदा गायकवाड, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा कॉ. लता गायकवाड, कॉ. श्याम सरोदे आणि कॉ.जयराज गायकवाड, टायगर ग्रुपचे बाळासाहेब जाधव आणि सुनील भाऊ अनंतवार आदि उपस्थित होते.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या पदाधिकारी कॉ. शिलाताई ठाकूर, कॉ.वर्षाताई सांगडे, कॉ. सारजा कदम, कॉ. सुनीता पाटील, कॉ. इंदू शीतळे, कॉ. जयश्री मोरे आदींनी प्रयत्न केले. वाजेगांव जिल्हा परिषद शाळेतील शालेय पोषण आहार योजनेतील अपहार झाल्याप्रकरणी कारवाई आणि मागील फरकासह सर्व बिले देण्यात यावेत तसेच प्रजा बालक विद्यामंदिर शाळेवर कारवाई करावी. यासंदर्भात देखील चर्चा करण्यात आली आणि शिक्षण विभागाने तसा अहवाल दिला आहे, असे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगीतले.