नांदेड(प्रतिनिधी)-आम आदमी पार्टीच्यावतीने शहरातील पाणी पुरवठा पुर्वस्थितीत म्हणजे दोन दिवसांआड करणे आणि शहराला पिण्यायोग्य शुध्द पाणी पुरवठा करण्यासाठी 26 जुलै रोजी महानगरपालिेचे आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्याकडे मागणी केली होती. ती मागणी मान्य केल्याचे पत्र 9 ऑगस्ट रोजी कार्यकारी अभियंता मनपा संघरत्न सोनसळे यांनी आम आदमी पार्टी युवा नांदेडचे ऍड.शिलवंत शिवभगत यांना दिले आहे.
आम आदमी पार्टीने मनपा आयुक्तांकडे मागणी केल्याप्रमाणे नांदेड शहरात सुध्दा मागील दोन महिन्यापासून शहराला चार दिवसाआड एकदा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे शहराचे नागरीक पाण्याच्या कमतरतेने त्रासले आहेत. पाणी गढूळ येते, ते पिण्यायोग्य नसते. सध्या पावसाळा सुरू असल्याने, आणि दुषीत पाण्याने आजारांची शक्यता असल्यामुळे शहराला शुध्द पिण्यायोग्य पाणी मिळणे आवश्यक आहे. चार दिवसांऐवजी ते दोन दिवसांआड मिळावे असे निवेदनात लिहिले होते. आम आदमी पार्टीच्यावतीने या निवेदनावर ऍड.शिलवंत शिवभगत, ऍड.विशाल गच्चे, विनोद शितळे यांच्या स्वाक्षऱ्या होत्या.
या निवेदनाला महानगरपालिकेने प्रतिसाद दिला असून 9 ऑगस्ट रोजी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग संघरत्न सोनसळे यांनी आम आदमी पार्टीला पत्र दिले आहे.गोदावरी नदीच्या पात्रात पाणी कमी पडले तर आसना नदीवरील जलस्त्रोतातून पाणी पुरवठा केला जातो. असदवन, सिडको, डंकीन, काबरानगर येथील जलशुध्दीकरण केंद्र येथे पाणी शुध्द करून जनतेस वितरीत केले जाते.आयएएस मानांकनाप्रमाणे पाण्याचे शुध्दीकरण करूनच पाणी वितरीत करण्यात येते. वेळोवेळी पाण्याची तपासणी केली जाते. त्यामुळे मनपाकडून वितरीत होणारा पाणी पुरवठा हा पिण्यायोग्यच असतो. उलट काही नागरीक नळाला तोटी न लावत ते उघडे ठेवतात. त्यामुळे घाण पाणी आत जाण्याची शक्यता आहे.सध्या पाणी पुरवठा दोन दिवसाआड करण्यात येत आहे. तसेच अमृत 2.0 प्रकल्पास मंजुरी झाल्यानंतर एक दिवसाआड किंवा दररोज पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे आपण आपले आंदोलन मागे घेवून महानगरपालिकेस सहकार्य करावे.
आम आदमी पार्टीच्या मागणीला यश नांदेड शहराला मिळणार दोन दिवस आड पाणी पुरवठा