जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा उमरीचे व्यवस्थापक निलंबित

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा उमरी येथे बोगस एटीएम दिल्याप्रकरणी उमरी शाखेचे व्यवस्थापक राजपूत यांना निलंबित करण्यात आले आहे.
सौ.निशा विजय सोनवणे यांनी त्यांच्या उमरी बॅंक शाखेत जमा झालेले पडी अनुदान 19 हजार 800 रुपये उचलण्यासाठी दि.4 ऑगस्ट रोजी बॅंकेत गेल्या होत्या. तेंव्हा उमरी बॅंकेचे व्यवस्थापक/ शाखाधिकारी राजपूत यांनी त्यांना टोलवा-टोलवी करत तुमचे पैसे एटीएमद्वारे उचलल्याची माहिती दिली. तेंव्हा सौ.निशा विजय सोनवणे यांनी 5 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे स्तर व्यवस्थापक यांना अर्ज दिला आणि आमची फसवणूक झाल्याची माहिती सादर केली.
त्यानंतर सौ.निशा विजय सोनवणे यांनी उमरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 471 नुसार एक अनोळखी माणुस असे आरोपी सदरात लिहिुन उमरी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 231/2023 दाखल केला. याबाबत दि.22 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सौ.निशा विजय सोनवणे यांना पत्र दिले असून त्या पत्रात आपल्या तक्रारीच्या अनुशंगाने ज्या एटीएम सेंटरमधून आपल्या बॅंक खात्यातील 19 हजार 800 रुपये उचल करण्यात आली आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही प्राप्त केले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक उमरीचे शाखाधिकारी राजपूत यांना निलंबित करीत आहोत. या प्रकरणी त्यांची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे या पत्रात नमुद आहे.
चुकीचे आणि बोगस एटीएम कार्ड उमरी बॅंक शाखेतून निर्गमित करण्यात आले आहे हे सिध्दच झाले आहे. पण तो बोगस एटीएम कार्ड मिळविण्यासाठी कोणी अर्ज केला, त्याला कोणी मंजुरी दिली, तो एटीएम कार्ड कोणी घेतला आणि त्यावरून सौ.निशा विजय सोनवणे यांच्या खात्यातील रक्कम कोणी गायब केली. हे शोधणे आवश्यक आहे. नांदेड जिल्ह्यात जवळपास 66 शाखा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे आहेत. त्या सर्व शाखांमधून असे बोगस एटीएम कार्ड कोणी-कोणी काढले आणि शेतकऱ्यांची रक्कम कोणी गायब केली. याचा शोध होणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *