नांदेड(प्रतिनिधी)-एका 14 वर्षीय बालिकेवर अन्याय करणाऱ्या 22 वर्षीय युवकाला जिल्हा विशेष न्यायाधीशांनी 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.10 ऑगस्ट रोजी मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 14 वर्षीय बालिकेच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी 14 वर्ष 22 दिवसांची आहे. ते मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेत मजुर आहेत. मी आणि माझी पत्नी दररोज कामाला जातो. दि.7 ऑगस्ट रोजी आम्ही आमच्या मुलीला शाळेत पाठविले. सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर मुलगी घरी नव्हती. मग इकडे-तिकडे विचारणा केली पण मुलीचा काही पत्ता लागला नाही. एका अज्ञात माणसाने मला माझी 14 वर्षाची मुलगी कृष्णा केशव राजेगोरे (22) याने पळवून नेल्याचे सांगितले. त्यानुसार मी तक्रार दिली आहे. हा गुन्हा मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 89/2023 नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 363 नुसार दाखल झाला.
त्यानंतर पोलीसांनी विविध प्रकारे पळून गेलेल्या जोडप्याची माहिती घेतली असता अर्धापूर येथे हे दोन्ही 28 आगस्ट रोजी सापडले. त्यानंतर 22 दिवस हे सोबत असल्यामुळे या गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमांच्या कलमांची वाढ झाली. या गुन्ह्याचा तपास मनाठाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे यांच्याकडे देण्यात आला.
आज 29 ऑगस्ट रोजी संतोष शेकडे आणि त्यांच्या सहकारी पोलीसांनी पकडलेल्या कृष्णा केशव राजेगोरेला न्यायालयात हजर केले. सहाय्यक सरकारी वकील ऍड.एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी या आरोपीला पोलीस कोठडी देण्याची का गरज आहे याचे सविस्तर सादरीकरण केल्यानंतर न्यायालयाने कृष्णा केशव राजेगोरे (22) यास 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
14 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणारा 22 वर्षीय युवक पोलीस कोठडीत