मोठ्या भावाचा खून करणारा छोटा भाऊ पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या भावाला तुझ्याकडे वापरण्यासाठी असलेली जास्तीची शेती मला परत कर असे सांगून मोठ्या भावाला खाली पाडून त्याच्या छातीवर बसून दगडाने ठेचून खून करणाऱ्यास देगलूरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी चार दिवस अर्थात 2 सप्टेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
देगलूर तालुक्यातील हनुमान हिप्परगा या गावात हा भयंकर प्रकार 28 ऑगस्टच्या रात्री 9 वाजेदरम्यान घडला. गंगामणी संजय नक्कावार या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 28 ऑगस्ट रोजी त्या, तिचे पती आणि सासु कलुबाई हे घरी असतांना रात्री 8.30 वाजता त्यांचा दीर व्यंकट बसवंत नक्कावार(32) हा त्यांच्या घरी आला आणि त्याचे पती संजय नक्कावारला म्हणाला तुझ्याकडे वापरण्यासाठी असलेली जास्तीची शेती मला परत दे या दोन्ही भावांमध्ये वाद झाला आणि छोटा भाऊ व्यंकट आपल्या घराकडे निघून गेल्यावर मोठा भाऊ संजय नक्कावार त्याला समजावण्यासाठी गेला. व्यंकटच्या घराकडे गेल्यावर संजय नक्कावारला व्यंकट नक्कावारने खाली पाडून विरुदेव मंदिरासमोर त्याच्या छातीत आणि डोक्यावर दगडाने ठेचून त्याचा खून केला.
29 ऑगस्टच्या रात्री 2 वाजता व्यंकट बसवंत नक्कावार (32) याच्याविरुध्द आपला भाऊ संजय बसवंत नक्कावार (38) याचा खून केल्याचा गुन्हा दाखल झाला. देगलूरचे पोलीस निरिक्षक संजय हिब्बारे यांच्या नेतृत्वात देगलूर पोलीस पथकाने व्यंकट बसवंत नक्कावारला अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक रवि मुंडे यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
आज दि.30 ऑगस्टच्या दुपारी भावाचा खून करणाऱ्या व्यंकट नक्कावारला पोलीस पथकाने देगलूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पोलीसांची विनंती मान्य करून भावाचा खून करणाऱ्या व्यंकटला चार दिवस अर्थात 2 सप्टेंबर 2023 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *