पोलिसांच्या वतीने ड्रोन कॅमेरात सर्व आंदोलन कैद करण्यात आले.


नांदेड(प्रतिनिधी)-मौजे अंतरवाली सराटी ता.आंबड जि.जालना येथील मराठा आंदोलकांवर आणि उपोषणकर्त्यांवर अमानुष लाठी चार्ज केल्याबद्दल आज नांदेड येथे सकल मराठा समाजाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. सगळ्यात शेवटी एक टायर जाळण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी कोणी तरी छुप्या पध्दतीने होकार दिलेला होता. परंतू काही पोलीस अधिकाऱ्यांनी आणि पोलीस अंमलदारांनी टायर जाळण्याचा प्रयत्न हाणून पाडला.

काल दि.1 सप्टेंबर 2023 रोजी मौजे अंतरवाली सराटी ता.आंबड जि.जालना येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला म्हणे. आरक्षण देणे यामध्ये सर्वात मोठी अडचण प्रत्येक शासनाची होती. आजच्याही शासनाची आहे. संविधानाने दिलेले अधिकार आज बदलता येत नाहीत. कोणत्याही दुसऱ्या आरक्षणात मराठा आरक्षण जोडता येणार नाही.मराठा आरक्षण जाहीर झालेच तर बरेच दुसरे आरक्षण मागणारे समाज तयारच आहेत. मग संविधानाने दिलेले 50 टक्के आरक्षण न ठेवता जातीनिहाय सर्वांनाच आरक्षण देवून टाकावे. खुला प्रवर्ग ठेवूच नये अशी वेळ आता आली आहे असो. अंतरवाली येथे झालेल्या आंदोलनात काय घडले, काय सत्य परिस्थिती होती आणि काय खरे आहे हे जाणून घेण्याची पण गरज आहे. आजचे नांदेड येथे झालेले आंदोलन अर्थात पोलीसांचे म्हणजेच सरकारच्या विरोधातले आहे. सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची मुभा सुध्दा संविधानानेच दिलेली आहे. संविधानाने आंदोलन करण्याची पध्दत सुध्दा नमुद केलेली आहे.

आजच्या आंदोलनात सांगितले जात होते की, मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीचे अनेक व्हिडीओ आणि अनेक छायाचित्र व्हायरल झाले. पोलीसांचा मात्र एकही फोटो व्हायरल झाला नाही. वेगवेगळ्या विचारवंतांनी आंतरवाली प्रकरणात आपले विचार मांडले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एक निवेदन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना पाठवले. सोबतच या निवेदनात 4 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा राज्य सरकारचा निषेध म्हणून आणि जालना पोलीसांच्या चौकशीसाठी नांदेड बंद पुकारण्यात येईल असा इशारा लिहिला आहे.

यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभ्या असलेल्या एका चार चाकी वाहनाचा ताबा पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी घेतला. द्वारकादास चिखलीकर येताच सर्वच पोलीस अंमलदार त्या गाडीला गराडा घालून उभे राहिले. परंतू यामध्ये सुध्दा राजकारण होते. काही पोलीस अधिकाऱ्यांन वाटत होते की, टायर जाळले जावे. परंतू चिखलीकर आणि अनेक पोलीस अंमलदारांनी त्या गाडीच्या डिक्कीतील टायर काढून त्याचा गाडा करुन त्याच्यासोबत खेळत ते टायर पोलीस ठाणे वजिराबादमध्ये नेऊन ठेवले. आजच्या आंदोलनात अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वात पोलीस विभागाने मेहनत घेतली.
आंतरवालीचे काही फोटो

आंतरवाली येथे नेहमीप्रमाणे जगाची वहिणी असलेल्या एस.टी.गाड्यांवर आंदोलकांनी आपला राग काढला आणि 11 बस गाड्या पेटून दिल्या. कोणाच्या आहेत या बस गाड्या, कोण मालक आहे याचा, कोणासाठी आहेत ह्या बस गाड्या याचा विचार आजपर्यंतच्या कोणत्याही आंदोलनामध्ये झालेला नाही. मग जालना येथे असे काही घडले तर त्यात नवीन काही नाही. आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर बोलतांना आंदोलक म्हणत होते की, कोणत्याही पोलीसाला मार लागलेला नाही. पण हे फक्त बोलण्यासाठी आहे. आंतरवालीच्या आंदोलनात आंदोलकांनी महिला पोलीस निरिक्षकासह अनेक पोलीसांना दगडफेक करून गंभीर जखमी केले आहे. त्यातील एक पोलीस तर व्हेन्टीलेटरवर आहे. म्हणजे ही बाब गंभीर नाही काय? आंतरवालीचेच नव्हे तर कोणतेही आंदोलन होत असतांना पोलीस हे आपल्यामधील भाग आहे असे कोणत्याही आंदोलकांनी समजलेले नाही. का? खरे तर पोलीस हे समाजातूनच जातात आणि समाजाच्या मालमत्तेचे आणि जिविताचे रक्षण करण्याची जबाबदारी पार पाडतात.मग त्यांच्यावर हल्ला करून आम्ही काय मिळवणार ती मंडळी सुध्दा आमचे भाऊ, बंधू, वहिनी, काका, बहिण या सदरातले आहेत असो. पोलीसांना जखमी झाल्याचे पाहिल्यानंतर जालनाचे पोलीस अधिक्षक तुषार जोशी यांनी लाठीचार्जचा निर्णय घेतला तो निर्णय त्यांनी घेतला नसता तर काय घडले असते हे लिहितांनाच भिती वाटत आहे. वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने प्रत्येक आंदोलनात भाग घेणाऱ्या सर्व आंदोलकांना विनंती आहे की भारतीय संविधानाने आंदोलनाचा हक्क दिलेला आहे आणि त्याची पध्दतीपण सांगितली आहे. त्याप्रमाणे आंदोलन करा आणि आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जरूर लढा परंतू असे अघडीत काही करू नका ज्यामुळे पुन्हा समाजाला त्रास होईल.
