नांदेड(प्रतिनिधी)-बांधकाम महानगरपालिकडून चोरून केले आहे ते बांधकाम पाडून टाकावे लागेल, त्यासाठी दीड लाख रुपये दंड सुध्दा लागेल अशी भिती दाखवून 20 हजारांची लाच मागणाऱ्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका वजिराबाद क्षेत्रीय कार्यालयातील लिपीक आणि एका खाजगी इसमाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड करून त्यांच्याविरुध्द इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एका माणसाने 31 ऑगस्ट रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, त्यांचे स्वत:चे आणि त्यांच्या भावाच्या मालकीच्या जागेत डीनशेड उभे करून त्यात ते कापड दुकान चालवतात. दि.27 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी असतांना सुध्दा महानगरपालिकाचा माणुस आला अणि त्यांच्या टीनशेडची मोजणी करून गेला. उद्या 28 ऑगस्ट रोजी महात्मा गांधी पुतळ्याजवळी महानगरपालिका कार्यालयात येवून भेटण्याची तंबी दिली. तुमचे काम काठीकर साहेब यांच्याकडे आहे, तेच तुमचे काम करणार असे पण सांगितले. तक्रारदार काठीकरांना भेटले तेंव्हा तुमचे बांधकाम चोरून केलेले आहे, ते बांधकाम पाडावे लागेल, त्यासाठी दीड लाख रुपये दंड लागेल असे काठीकरने सांगितले. तेंव्हा तक्रारदाराने माझे बांधकाम पाडू नका, पाहिजे तर टॅक्स कर वाढवा अशी विनंती केली. तेंव्हा लिपीक काठीकराने या कामासाठी मला वेगळे 20 हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले आणि त्यानंतर ती 20 हजार रक्कम लाच असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तक्रार दिली.
2 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष या लाच मागणीची पडताळणी केली. यात एक खाजगी माणुस अफजल तक्रारदाराला म्हणाला तुमचे काम 40 ते 45 हजार रुपयांचे आहे परंतू काठीकर साहेब 20 हजारांमध्ये तुमचे काम करुन देत आहेत. काठीकरने तक्रारदाराला मला फोन लावायचा नाही अफजलकडे 20 हजार देवून टाका अशी लाचेची मागणी केली. लोकसेवक असलेले काठीकर यांनी खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून अनाधिकृत बांधकाम पाडण्याची भिती दाखवून 2 सप्टेंबर रोजी खाजगी व्यक्ती मिर्झा अफजल बेग यांच्यावतीने 20 हजार रुपये लाच स्विकारली. लाच स्विकारतात स्थानिक संस्था कर व अतिरिक्त कार्यभार क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 वजिराबादचे गिरीश चिंताहरी काठीकर (52) यास आणि सोबत खाजगी व्यक्ती मिर्झा अफजल बेग शमशोद्दीन बेग (54) रा.टिपुसुलतान रोड या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्यासह पोलीस निरिक्षक अरविंदकुमार हिंगोले, गजानन बोडके, कालीदास ढवळे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मांजरमकर, पोलीस अंमलदार शेख रसुल, राजेश राठोड, सय्यद खदीर, गजानन राऊत, प्रकाश मामुलवार, निळकंठ येमुलवार यांनी ही सापळा कार्यवाही पुर्ण केली.
गिरीश काठीकर हे अत्यंत देवभक्त आहेत आणि मोठ-मोठ्या गुत्तेदारांसोबत त्यांच्या विविध जागी भागिदाऱ्या आहेत. एका लिपीकाजवळ एवढ्या भागिदाऱ्या असतांना सुध्दा त्यांना 20 हजार रुपये लाच घ्यावीच वाटली याचाच अर्थात महाभारतात सांगितल्याप्रमाणे आता पापाचे शंभर घडे भरले होते.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही माहिती देतांना जनतेला आवाहन केले आहे की, कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी, शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल तसेच त्याच्या लाच मागणीचे मोबाईल फोनवर बोलणे असेल,ऑडीओ, व्हिडीओ असेल, एसएमएस असतील तसेच भ्रष्टाचार संबंधाने कांही माहिती असेल तसेच माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केल्याची माहिती प्राप्त झाली असेल तर याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. त्यासाठी टोल फ्रि क्रमांक 1064(2), कार्यालयाचा फोन क्रमांक 02426-253512 यावर आणि पोलीस उपअधिक्षक राजेंद्र पाटील यांचा मोबाईल क्रमांक 7350197197 सुध्दा माहिती देता येईल तसेच एसीबी विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर आणि फेसबुक पेजवर सुध्दा याची माहिती देता येईल जनतेने भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही माहिती द्यावी असे आवाहन एसीबी केले आहे.
मनपा क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4 वजिराबादचा लिपीक खाजगी माणसासह 20 हजारांच्या लाच जाळ्यात अडकला