
नांदेड(प्रतिनिधी)-जालना घटनेचे पडसाद नांदेड जिल्ह्यातही शनिवारी आणि रविवारी उमटले. यात नांदेड आगाराच्या एका बसेसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले तर शनिवार नांदेड आगारातून काही मोजक्याच मार्गावर बसेस चालू असल्याने सर्वसामान्य प्रवाशांची मात्र बेहाल झाले होते. तर सोमवारी नांदेड बंदची हाक दिल्याने सोमवारी बसेस रस्त्यावर धावणार नाही अशी माहिती राज्य परिवहन महामंडळ नांदेड विभागाकडून देण्यात आली.
जालना घटनेचे पडसाद जिल्ह्यात चांगलेच उमटले. शनिवारी सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. तर नांदेडहून टेंभुर्णीकडे रात्री मुक्कामी जाणाऱ्या बस क्रमांक एम.एच.40 एन.9757 या गाडीवर शनिवारी रात्री 8 च्या सुमारास हाळदा ते काटकळंबा या दरम्यान अज्ञात चार ते पाच जणांनी जोरदार दगडफेक करून एस.टी.बसचे जवळपास 30 ते 40 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. यात बस चालकाने प्रसंगावधान राखत बसमधील प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा पोहचू दिली नाही. बसमधील प्रवाशीही अधिकचे नव्हते. ही घटना घडल्यानंतर उस्माननगर पोलीस ठाण्याशी संपर्क करून अज्ञात हल्लेखोरांविरुध्द उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवप्रसाद मुळे यांनी दिली.

रविवारी नांदेड आगारातून नांदेड-देगलूर, नांदेड-भोकर, नांदेड-बिलोली आणि नांदेड-हदगाव या मार्गावर तुरळक गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तर लांबपल्यांच्या गाड्यांमध्ये नांदेड-नागपूर आणि नांदेड हैद्राबाद या दोनच मार्गांवर गाड्या सोडण्यात आल्या. उर्वरीत मात्र एकाही मार्गावर एस.टी.गाडी सोडण्यात आली नसल्याने बसस्थानकात प्रवाशी मात्र ताटकळत बसले होते.
रविवारी नांदेड आगारातून बसेस सोडण्यात आल्या नसल्यामुळे एका दिवसाचा जवळपास 7 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नांदेड बस आगार व्यवस्थापकाकडून देण्यात आली. सोमवारी नांदेड बंदची हाक दिली असल्याने नागरीकांनी कोणत्याही परिस्थिती घराच्या बाहेर पडू नये. अत्यंत आवश्यक काम असल्यास तरच घराच्या बाहेर पडावे अन्या पडू नये अशा सुचनाही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या. आहेत.

आज राज्यात तलाठी भरती परिक्षा नियोजित आहे. याच दरम्यान मराठा क्रांती मोर्चाने बंद पुकारला असल्यामुळे परिक्षा देणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या बंदची गैरसोय मोठ्या प्रमाणायत होणार आहे. कारण बंदच्या पार्श्र्वभुमीवर राज्य परिवहन महामंडळ आणि खाजगी वाहनेही बंद राहण्याची शक्यता अधिकची आहे. यामुळे राज्य सरकारने ही परिक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांमधून समोर येत आहे.