
नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून स्थानिक गुन्हा शाखेने तीन जणांकडून 71 किलो 550 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या गांजातील बाजारातील किंमत 15 लाख 31 हजार रुपये आहे अशी माहिती पोलीसांनी प्रेसनोटमध्ये दिली आहे.
शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठा खुर्द या मार्गावर अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायदाचा भंग करून उड्डाणपुलाखाली गांजाची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर 6 सप्टेंबर रोजी दुपारी 11.30 वाजता पोलीस पथक, राजपत्रीत अधिकारी, महसुल विभागातील राजपत्रीत अधिकारी त्या उड्डाणपुलाजवळ थांबले असतांना दुपारी 1 वाजेच्यासुमारास ऍटो क्रमांक एम.एच.26 बी.डी.4509 हा तेथे आला. त्या ऍटोची तपासणी केली असता त्यामध्ये छोट्या-मोठ्या विविध साईजचे प्लॅस्टीक पॉकीट होते. ज्यामध्ये एकूण 71 किलो 550 ग्रॅम गांजा भरलेला होता. या गांजाची बाजारातील किंमत 15 लाख 71 हजार रुपये आहे. या ऍटोचा चालक मिर्झा मोहसीन नजिर बेग (22) रा.मुजामपेठ धनेगाव, सय्यद मुक्तार मोहम्मद सलीम (35)हिंगोली नाका, परविनबेगम सय्यद मुक्तार (30) रा.हिंगोली नाका असे तिघे होते. हा गांजा त्यांना विक्री करण्यासाठी टायर बोर्डजवळील जोहराबी उर्फ बब्बाखाला अन्वर खान पठाण यांनी दिल्याचे या तिघांनी सांगितले. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिहिपर्यंत सुरू होती.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, विमानतळचे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने, नायब तहसीलदार के.बी.डांगे, पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, दत्तात्रय काळे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक माधव केंद्रे, पोलीस अंमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, रणधिर राजबन्सी, महेश बडगु, गजानन बैनवाड, पंचफुला फुलारी, शेख महेजबीन, अर्जुन शिंदे आणि शेख सलीम यांनी पार पाडली.