नांदेड(प्रतिनिधी)-मौजे सांगवी ता.नायगाव येथे एका शाळेत 8 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना बोगस नियुक्ती देवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेतील अधिक्षकांनी दिलेल्या तक्रारीनंतर दोन महिलांसह एक पुरूष अशा तिघांविरुध्द कुंटूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा परिषदेतील अधिक्षक बळीराम इरन्ना येरपुलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे सांगवी ता.नायगाव येथील नारायण पाटील कदम माध्यमिक विद्यालयात 1 जानेवारी 2013 ते 12 जुलै 2022 दरम्यान आठ शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना नारायण पाटील कदम माध्यमिक विद्यालय सांगवी येथे बोगस नियुक्त्या देण्यात आल्या. त्या नियुक्त्यांच्या संदर्भाने तसाच बोगस ठराव घेवून या बोगस नियुक्त्यांसाठी शालार्थ आयडी मंजुर करून घेण्यासाठी प्रस्ताव पाठवला. ही बाब जिल्हा परिषदेत उघडकीस आल्यानंतर बोगस नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यासह जिल्हा परिषद प्रशासन आणि शासनाची दिशाभुल करणाऱ्या दिगंबर नारायण कदम, ताराबाई बापूराव कदम आणि मैनाबाई नारायण हिवराळे या तिघांविरुध्द कुंटूर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 417, 419, 468, 469 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 158/2023 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनात कुंटूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल बहास्सारे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक व्यंकट कुसमे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नायगाव तालुक्यातील नारायण पाटील कदम शाळेत बोगस शिक्षकांची भर्ती