नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे विभागातील वरिष्ठ अभियंता नांदेड याने 5 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडल्यानंतर विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी त्यास पोलीस कोठडीत पाठविले आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असाच वरिष्ठ अभियंता विद्युत विभाग पुर्णा याच्यावरही सापळा रचला होतो. परंतू तो पळून गेला आहे असे सांगतात.
काल सायंकाळी 5 वाजता रेल्वे स्थानकावरील वरिष्ठ अभियंता विद्युत विभाग शिवय्या एम. यांच्या कार्यालयात कोणी तरी अधिकारी आले आणि दार बंद करून काही तरी कार्यवाही सुरू होती अशा आशयाचे वृत्त फक्त वास्तव न्युज लाईव्हने छापले होते. या संदर्भाने आज न्यायालयातून मिळालेल्या माहितीनुसार शिवय्या मुकीरी वरिष्ठ अभियंता विद्युत याच्याविरुध्द केंद्रीय अन्वेषण ब्युरोमधील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे 7 सप्टेंबर रोजी एक तक्रार प्राप्त झाली. या तक्रारीनुसार एक रेल्वे गुत्तेदार हा 2013 पासून 26 जुलै 2021 पर्यंत रेल्वे विभागाकडे आपल्या तीन गाड्या लावून वाहतूकीचे काम करत होता. या तिन गाड्या पुर्णा, औरंंगाबाद आणि नांदेड येथे कार्यरत होत्या. या संदर्भाने निविदे प्रमाणे त्या कामांची किंमत 47 हजार 999 रुपये प्रति वाहन प्रति महिना अशी होती. हा कराराचा कालावधी 2 वर्षाचा होता. त्याची एकूण किंमत 34 लाख 55 हजार 928 रुपये होती. हा निविदेचा कालावधी 25 जुलै 2023 रोजी संपला. कंत्राटदाराने 26 फेब्रुवारी 2023 ते 25 जुलै 2023 दरम्यानचे जवळपास 7 लाख रुपयांचे बिल देणे आणि मोजमाप पुस्तीका लिहिण्यासाठी नांदेडचे वरिष्ठ अभियंता विद्युत शिवय्या एम. याच्याकडे पाठ पुरावा केला. पण शिवय्या त्यांचे काम करत नव्हते आणि 10 हजार रुपयांची लाच मागत होते. त्यातील 5 हजार रुपये लाच शिवय्या एम. यांनी फिर्यादीवर जबाव टाकून चार ते पाच दिवसांअगोदरच घेतली. त्यानंतर तक्रारदाराने 7 सप्टेंबर 2023 रोजी तक्रार दिली आणि नांदेड कार्यालयात या तक्रारीची पडताळणी केली. 7 सप्टेंबर रोजी हे सिध्द झाले की, शिवय्या एम. याने तक्रारदाराकडून 10 हजार रुपये लाच मागितली होती आणि त्यातील 5 हजार रुपये घेतांना 11 सप्टेंबर रोजी नांदेड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 4 मध्ये सीबीआय पथकाने शिवय्या एम. यास रंगेहात पकडले.
आज सीबीआय पथक पुणेचे पोलीस निरिक्षक मुकेश प्रचंड यांनी शिवय्या एम.ला न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणात सीबीआयने बाजून मांडतांना न्यायालयाला सांगितले की, शिवय्या एम. याच्या कार्यालयातून तो लाच मागणे आणि लाच स्विकारणे यासाठी दोषी असल्याचे अनेक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. फिर्यादी आणि लाचखोर शिवय्या एम. यांचे बोलणे रेकॉर्ड केलेले आहे. या प्रकरणात विद्युत अभियंता शिवय्या एम.च्यावतीने ऍड.बालाजी शिंदे यांनी काम पाहजे. युक्तीवाद ऐकून सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी शिवय्याला दोन दिवस अर्थात 14 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
या कंत्राटदाराचे काम पुर्णा येथे सुध्दा सुरू होते. तेथील वरिष्ठ विद्युत अभियंता सुध्दा तक्रारदाराला लाच मागत होता सीबीआय पथकाने काल 11 सप्टेंबर रोजी पुर्णा येथे सुध्दा सापळा रचला होता. परंतू तेथील वरिष्ठ अभियंता विद्युत याने मोबाईलवरून लाचेचे पैसे गाडीत ठेवा असे सांगितले होते म्हणे आणि त्याला शंका आल्यामुळे तो पळून गेला आहे. पुर्णाचे कार्यक्षेत्र परभणी जिल्हा असल्याने पुर्णा येथील वरिष्ठ अभियंता विद्युत याची सर्व कार्यवाही जिल्हा न्यायालय परभणी येथे होणार आहे. या सर्व माहितीला मात्र कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने अद्याप दुजोरा दिलेला नाही.