नांदेड(प्रतिनिधी)- १६ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे होणार्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी विभागीय आयुक्तालयासह जिल्ह्यातील विविध विकास कामांसंदर्भाने प्रस्ताव पाठवले असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बुधवार (दि.१३) रोजी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या दालनात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवी सांगता समारोहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध ठिकाणी १४ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ रोजी शहरात म.फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. याच दिवशी प्रत्येक शाळेमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामात आहूती देणार्या स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणी जागृत करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मनोगत तसेच सायंकाळी इतिहास तज्ज्ञांचा परिसंवाद व चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. १६ रोजी प्रत्येक गावात मध्यरात्री दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर रोजी नांदेडच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात हयात असलेल्या ५३ स्वातंत्र्यसैनिक, १९४ वारस पत्नी यांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
१६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार्या बैठकीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय, किनवट येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय, जलसंपदा विभागाच्या बाबतीत असलेले प्रश्न, धर्माबाद तालुक्यातील मालगुजरी तलाव दुरूस्तीचा प्रस्ताव, जालना-नांदेड द्रुतगती महामार्गावरील पूल व रस्ते, शहरातील उडाणपूल, जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही, जिल्ह्याचा पर्यटन प्रस्ताव या मंत्रिमंडळ बैठकीसाठी पाठवण्यात आला आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाविषयी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यात आजपर्यंत ३८ ठिकाणी १६४ जण उपोषणाला बसले आहेत. त्यातील नायगाव व वजिरगाव येथील उपोषणकर्त्यांनी प्रशासनाच्या विनंतीवरून उपोषण स्थगित केले आहे. मराठा, कुणबी नोंदी तपासण्यासाठी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन व देगलूरचे उपविभागीय अधिकारी जंगम यांच्या दोन समित्या नेमण्यात आल्या आहेत. या दोन्ही समित्या तेलंगणामध्ये रवाना झाल्या असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.