मराठवाडा मुक्तिसाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान भारताच्या अखंडतेच्या दृष्टीने अनमोल- पालकमंत्री महाजन

नांदेड (प्रतिनिधी)- मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम हा भारताच्या अखंड सार्वभौमत्वाला सिद्ध करणारा आहे. निझामाच्या तावडीतून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान संपूर्ण भारताच्या अखंडतेच्या दृष्टीने अत्यंत अनमोल असल्याचे, प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. मराठवाडा मुक्ति संग्राम दिनाच्या 75 वा वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठवाडा मुक्तिदिन समारंभात माता गुजरीजी विसावा उद्यान येथे हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पालकमंत्री गिरीश महाजन व मान्यवरांच्या हस्ते मानवंदना व पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार बालाजी कल्याणकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीने, मराठवाडा मुक्तिसंग्रामाने लोकशाहीच्या मूल्यांसह जो समृध्द वारसा दिला आहे तो नव्या पिढीपर्यंत पोहचावा यादृष्टीने आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासह मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव उत्साहाने साजरा करीत आहोत. हा समृध्द वारसा पुढे नेण्यासह भारतातील शेती, शेतकरी व सर्वसामान्यांच्या विकासासाठी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी अनेक लोकाभिमुख निर्णय घेवून विकासाला गती दिली आहे. जी-20 परिषदेचे अत्यंत समर्थपणे आयोजन करून जगातील सर्व देश प्रमुखांनी भारताला प्रधानमंत्री मोदीजींच्या स्वरुपात एका समर्थ नेतृत्वाची अनुभूती घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाडा मुक्ती दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री यांच्या हस्ते विसावा उद्यान येथील मुख्य शासकीय समारोहात प्रातिनिधीक स्वरुपात लोकार्पण करण्यात आले. यात अर्धापूर आणि भोकर येथील पोलीस स्टेशनच्या नुतन इमारत, नांदेड जिल्हा रुग्णालय येथील डायलेसीस सेंटर, आयपीएचएल प्रयोगशाळा, नांदेड येथील कोषागार कार्यालय सुरक्षा कक्ष नुतन इमारतीचे लोकार्पण झाल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाहिर केले. याचबरोबर क्रिडांगण व डिजीटल क्लासरुमचे भूमीपूजन, इंडियन स्वच्छता लिग 2.0 अंतर्गत विशेष स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. जिल्हा क्रीडा विभागाअंतर्गत पंडित दिनदयाल उपाध्याय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन झाल्याचे त्यांनी जाहिर केले.
गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांच्या मदतीला शासन खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना यातून सावरण्यासाठी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली. सुमारे 8.89 लाख शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत 472 कोटी रुपये नुकसान भरपाई वाटप करण्यात आले. या खरीप हंगामासाठी 1 हजार 812.14 कोटी रुपये पीक कर्ज वाटप केले. यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेती पिकाच्या नुकसानीसाठी 420 कोटी रुपये लवकरच देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 अंतर्गत 15 सप्टेंबर 2023 अखेरपर्यत 31 हजार 181 शेतकऱ्यांना 117.61 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ शासनामार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. मार्च व एप्रिल 2023 या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या 42 हजार 793 बाधित शेतकऱ्यांना 34 कोटी 21 लाख 68 हजार 863 रुपये इतका निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरीत करण्यात आला. पी.एम.किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यात 4 लाख 32 हजार 587 इतके पात्र शेतकरी असून त्यांना आजपर्यत एकूण रूपये 1 हजार 147 कोटी 1 लाख इतकी मदत वितरीत झाली आहे असेही पालकमंत्री महाजन यांनी यावेळी नमूद केले.
केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी आपण विविध योजना राबवित आहोत. याला राज्य शासनानेही जोड दिली आहे. नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून वैयक्तिक विहीर योजनेवर जिल्हा परिषदेने विशेष भर दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील बालकांच्या सुपोषणासाठी आयआयटी पवई यांच्या विद्यमानातून विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शाळा दत्तक योजनाबाबत मंत्रिमंडळात निर्णय घेतला आहे. देणगीच्या माध्यमातून ही दत्तक योजना कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाच्यावतीने पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले

मराठा समाजाला आरक्षण हा मुद्दा सध्या महाराष्ट्रात जोरदार पणे फिरत असतांना आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी पालकमंत्री गिरीश महाजन हे गोकुळनगर येथील विसावा उद्यानात ध्वजारोहणासाठी आले असतांना मराठा समाजातील अनेक युवकांनी मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही मंत्राला नांदेड जिल्ह्यात फिरू देणार नाही अशा घोषणा देत या युवकांनी काळे झेेंडे दाखवले. पोलीसांनी लगेच या युवकांना ताब्यात घेवून कार्यक्रम स्थळापासून दुर नेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *