पारंपरिक लोककला व कलागुण विकसित होण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आवश्यक- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

▪️आदिवासी बांधवांनी सादर केले पारंपारिक दंडार नृत्य

नांदेड, (जिमाका):- पारंपारिक नृत्य व लोककला हे पिढ्यानपिढ्या जपत विकसित होत असतात. त्या जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. लोककला व हा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वारंवार होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवोदित कलाकाराना आपल्या कला विकसित करण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन वर्षानिमित्त आज भक्ती लॉन्स येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, कुलगुरू उध्दव भोसले, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर व अधिकारी उपस्थित होते.

 

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी, लोक कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी आले होते. या गीत /नृत्य सादरीकरणात राज्यगीत, गोंधळ, स्वागत गीत, मराठवाडा गीत, बासरी वादन, देशभक्तीपर आधारित गीत व सादरीकरण, किनवट तालुक्यातील तलाईगुडा येथील आदिवासी बांधवाचे पारंपारिक पध्दतीचे आदिवासी सामुहिक नृत्य, खंडोबाची वारी, सर्जिकल स्ट्राईक, पोवाडा आदी वैविध्यपूर्ण कार्यक्रमानी प्रेक्षकांची मने वेधून घेतले.

 

किनवट तालुक्यातील तलाईगुडा येथील आदिवासी बांधवानी सादर केले पारंपारिक लोकनृत्य

सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वच नृत्य व देशभक्तीपर गीते, सादरीकरण उत्तम प्रकारे विद्यार्थी व कलाकारांनी सादर केले. यामध्ये किनवट तालुक्यातील तलाईगुडा येथील जय जंगो बाई दंडार नृत्यमंडळ येथील आदिवासी बांधवानी पारंपारीक पध्दतीने डोक्यावर मोरपिसाचा टोप, पायात व कमरेला घुंगरु, हातात लाकडी दांडा व वाद्याच्या तालावर ठेका धरत दंडार नृत्य सादर केले. या आगळयावेगळया नृत्याने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. यासोबतच विद्यार्थ्यांनी सर्जिकल स्ट्राईक व उमरी बँक दरोडा सादरीकरणाने उपस्थिताच्या डोळयासमोर हा प्रसंग उभा केला.

महसुल विभागाच्या मीना सोलापूरे यांनी देशभक्तीपर गीत व मराठवाडा गीत सामुहिक पध्दतीने गायले. गोंधळी व पोवाडा कलाकारानी पारंपारिक वेशभुषा करुन उत्तम कलाप्रदर्शनाचे सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *